केंद्र सरकारचे मोठे पाऊल : माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरणाला मंजुरी दिली असली तरी ते ऐच्छिक केले आहे. जन्म आणि मृत्यू या दोन्हीसाठी आधारचा ऐच्छिक वापर करण्यास सरकारने रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या कार्यालयाला मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने यासंबंधी एक अधिसूचना जारी करत रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयासह जनगणना आयुक्त देखील अशा नोंदणी किंवा रजिस्ट्रेशनसाठी आधार प्रमाणीकरणाचा विचार करू शकतात, असे स्पष्ट केले आहे. तसेच हे आधार प्रमाणीकरण ऐच्छिक असल्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने आधार कार्डधारकांना मोठी सुविधा दिली आहे. आता लोकांना जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी आधारची गरज भासणार नाही. सरकारने ते ऐच्छिक केले आहे. याचा अर्थ असा की जर लोकांना हवे असेल तर ते जन्म किंवा मृत्यू नोंदणीसाठी आधार वापरू शकतात किंवा आधार क्रमांक न वापरताही जन्म मृत्यूची नोंदणी होणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने 27 जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत यासंबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे. रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयासह जनगणना आयुक्तांनाही या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अंमलबजावणी देशपातळीवर करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही अधिसूचनेसंबंधीची माहिती पाठविण्यात आली आहे.
जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969 अंतर्गत आता आधार प्रमाणीकरणासाठी होय किंवा नाहीचा पर्याय दिला जाईल. आता आधारऐवजी इतर तपशील गोळा केले जातील. यामध्ये मुलाची ओळख, पालक आणि जीवनसाथी यांचा तपशील आता गोळा केला जाणार आहे.









