देवरुख / सुरेश करंडे :
आई वडिलांनी काबाडकष्ट करून आपल्याला लहानाचे मोठे केले. प्रत्येक गोष्टीचे लाड पुरवले. या ऋणाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र नौकरी करून उतार वयात आई-वडिलांच्या हाताला विश्रांती द्यायची. पासाठी मर्चेंट नेव्हीत दाखल व्हायचे, असे स्वप्न देवरुखचा सुपुत्र आदेश दताराम घडशी याने रंगवले होते. मात्र स्वप्नाचा पाठलाग करण्यापूर्वीच निवतीने आपला डाव साधत आदेशला हिरावून नेले. अचानक ‘एक्झीट’ने आदेशचे मर्चेंट नेव्हीत जाण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले आहे. आदेश हा आई-वडिलांचा एकुलता एक होता.
देवरुख खालची आळीतील रहिवासी दत्ताराम घडशी, हर्षा घडशी यांचा आदेश हा सुपुत्र, आदेशची आई पिग्मी गोळा करण्याचे तर वडील मोलमजुरीचे काम करतात. आदेशचे पहिले ते चौथी शिक्षण आदर्श शाळा देवरुख क्रमांक ३ येथे तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण साडवलीतील मिनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयात झाले. साडवली विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण आदेशने पूर्ण केले. बारावी परीक्षेत ६५ टक्क्यांनी तो उत्तीर्ण झाला. पेढे वाटून हा आनंद त्याने द्विगुणित केला.
आई-वडिलांनी कष्टात दिवस काढून आपल्याला मोठे केले, याची पुरेपूर जाणीव आदेशला होती. मर्चट नेव्हीत जावून आई-वडिलांच्या हाताला विश्रांती द्यायची, त्यांची अधुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा चंग आदेशने मनाशी बांधला होता, बारावी परीक्षेनंतर त्याने मर्चेंट नेव्हीत जाण्यासाठी लागणारी तयारीही सुरू केली होती. आपले स्वप्न त्याने आई-वडील, मित्रपरिवाराला बोलून दाखविले होते. या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले. आदेश सोमवारी मित्रपरिवारासमवेत रत्नागिरी येथे फिरायला गेला होता. सोमेश्वर तलावात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही, आदेशने पौहण्यासाठी तलावात उडी घेतली आणि पाण्यात बुडून त्याचा दुदैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, रात्री १०.३० वाजता पार्थिव देवरुख येथे आणून चर्मालय स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- आता आमचे कसे होणार?
आदेशचे पार्थिव दाखल होताच आई-वडिलांसह शेजाऱ्यांनी फोडलेला हंबरडा स्दय पिळवटून टाकणारा होता, आदेश तू आमच्या काळजाचा तुकडा आहेस रे, तू आम्हांला नको सोडून जाऊस रे, तू परत ये ना, तू गेलास तर आमचे कसे होणार रै.. असा हृदय पिळवून टाकणारा आक्रोश प्रत्येकाच्या कानी पडत होता. या आक्रोशाने उपस्थितांचे सुन्न होत त्यांनाही अश्रू अनावर झाले.
लग्नानंतर १० वर्षांनी आदेशच्या रूपाने त्यांना संतती प्राप्त झाली, संसार सुखाचा चालला होता. या सुखाला सोमवारी दृष्ट लागली. आदेश रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर तलावात पोहोण्यासाठी उतरला अन् पाण्यात बुडून त्याचा दुदैवी मृत्यू झाला
- सोळजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू
आदेशला शिक्षणाचरोबर क्रीडा क्षेत्रातही रुची होती. क्रिकेट, कबड्डी खेळात तो तरबेज होता. दोन्ही खेळात अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. सौळजाई क्रीडा मंडळाचा तो खेळाडू होता. खेळाच्या माध्यमातून त्याने मोठा मित्रपरिवार जोडला होता.
- घडशी कुटुंबाचा आधारवड हरपला
आदेश हा आई-वडिलांचा एकुलता एक असत्याने तो कुटुंबाचा आधार होता. सोमवारी आदेशवर काळाने झडप घातली. आदेशच्या जाण्याने घडशी कुटुंबाचा आधारवड हरपला आहे.








