रत्नागिरी :
वयाची साठी उलटलेल्या, पाठीला टेकलेल्या आणि डोळ्यांवर चष्मा असलेल्या अनेक निरक्षर व्यक्ती ज्ञानार्जनाच्या ओढीने परीक्षा केंद्रांवर पोहोचल्या. तेव्हा अनेक ठिकाणी एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. म्हाताऱ्या आया, थकलेले बाप आणि आयुष्यभर शेती-मजुरी केलेल्या अनेक व्यक्ती आज पहिल्यांदाच शाळेच्या वर्गात बसले होते. काही जणांच्या हातात पेन्सिल बरथरत होती, पण चेहऱ्यावर एक वेगळीच जिद्द होती. त्यांना शिकून स्वाक्षरी करायची आहे, बँकेचे व्यवहार समजून घ्यायचे आहेत, आणि नातवंडांना वाचताना पाहून त्यांनाही आपण मागे नाही, हे दाखवायचे आहे, यासाठीच त्यांनी परीक्षा देत उत्साह दाखवला.

जिल्ह्याने नवभारत साक्षरता अभियानांतर्गत ‘उल्लास’ कार्यक्रमात दाखवलेला हा उत्साह केवळ आकडेवारी नाही, तर पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांच्या मनात पेटलेली ज्ञानाची ज्योत असेच म्हणावे लागेल. रविवारी सकाळी १० वाजता परीक्षा सुरू झाली, तेव्हा अनेक ठिकाणी नवसाक्षर परीक्षार्थीचा विक्रमी प्रतिसाद लाभला. या अभियानासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ९,५४८ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, जिल्ह्यातील १४,०६५ निरक्षरांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली. त्यापैकी चाचणीत भाग घेतला.
- प्रत्येक घटकाच्या सहकार्यामुळे मिळाले यश
जिल्ह्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे महाराष्ट्रात एकमेव जिल्हा म्हणून रत्नागिरीची निवड झाली. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिल्ली येथे राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अचूक नियोजनामुळे आणि प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटकाच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. ही चाचणी यशस्वी करण्यात सर्व अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. या उपक्रमामुळे निरक्षरतेचे पूर्णपणे निर्मूलन होऊन समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असा विश्वास शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केला.








