पुणे / वार्ताहर :
किरकोळ वादातून 15 ते 17 वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांनी एका 25 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा प्रकार वानवडी परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. महादेव रघुनाथ मोरे (वय 25, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मयत महादेव मोरे हा वानवडी परिसरातील ढेरे कंपनी जवळ डोंगरावर दारू पीत बसला होता. संबंधित ठिकाणी तो एकटाच असल्याची माहिती आरोपी मुलांना मिळाली. त्यानुसार 15 वर्षाची तीन, 16 वर्षाचा एक आणि 17 वर्षाचा एक अशा पाच मुलांनी डोंगरावर जाऊन बेसावध असलेल्या महादेव मोरे याचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर संबंधित आरोपी मुले पसार झाली होती. याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविचछेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. तसेच मयताच्या घराजवळ राहणारी तीन मुले आणि हडपसर परिसरातील दोन मुले अशा पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. जुन्या वादातून मोरे याचा खून केल्याची कबुली त्या मुलांनी पोलिसांना दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पटारे यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास वानवडी पोलीस करत आहे.









