पूर्व वैमनस्यातून गावातीलच तरुणांनी केला हल्ला : खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ

बेळगाव : मारिहाळ, ता. बेळगाव येथील एका युवकाचा सरकारी शाळेच्या आवारात तलवारीने हल्ला करून भीषण खून करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 19 मे रोजी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. महांतेश रुद्राप्पा करलिंगण्णावर (वय 24) रा. मारिहाळ असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर महांतेशचा मृतदेह शवागारात हलविला. खुनाच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. महांतेशचा भाऊ संतोष याने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार महांतेश हा उद्यमबागमधील एका कारखान्यात कामाला जात होता. गुरुवारी रात्री गावातील सरकारी शाळेजवळ तो गेला होता. मोबाईल बघत बसलेला असताना गावातीलच काही तरुणांनी तलवारीने हल्ला करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
तीन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून भांडण
तीन दिवसांपूर्वी गावातील काही तरुणांबरोबर महांतेशचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. यावेळी वादावादीही झाली होती. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. हाच राग मनात ठेवून गावातील काही तरुणांनी गुरुवारी रात्री महांतेश एकाकी बसलेला असताना सरकारी शाळेच्या आवारात त्याचा खून केला आहे. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दोघा जणांना अटक
तरुणाच्या खून प्रकरणी मारिहाळ पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. अक्षयकुमार नागाप्पा कोनकेरी (वय 23) रा. सुळेभावी, राजेसाब हनीफ मुल्ला (वय 23) रा. मारिहाळ अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.









