भांडणातील ढकलाढकलीनंतर पडून मृत्यू : अल्पवयीन मुलासह दोघा जणांना अटक
बेळगाव : क्षुल्लक कारणावरून कॅम्प येथील एका तरुणाचा खून झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा कॅम्प पोलीस वसाहतीच्या बाजूला ही घटना घडली आहे. यासंबंधी एका अल्पवयीन मुलासह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. एरिकस्वामी अलेक्झांडर अँथोनी (वय 25) रा. अँथोनी स्ट्रीट, कॅम्प असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून जस्टीन झेवियर स्टीवन (वय 19, पॅम्प) याच्यासह अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. कॅम्प परिसरातील एक मुलगा रस्त्यावरून जाताना आरडाओरड करीत जात होता. त्यावेळी एरिकस्वामीने त्याला कशासाठी अशी आरडाओरड करतोस? अशी विचारणा केली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर रात्री कॅम्प पोलीस वसाहतीजवळ एरिकस्वामी व जस्टीन यांच्यात पुन्हा भांडण जुंपले. भांडणानंतर दोघा जणांनी एरिकस्वामीला जोरात ढकलून दिले. खाली पडलेला एरिक गंभीर जखमी झाला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मुका मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घरात चहा घेऊन बाहेर फिरायला गेलेला मुलगा रात्री जेवणाच्या वेळेपर्यंतही घरी पोहोचला नाही. त्यामुळे एरिकस्वामीची आई सिसिलिया यांना त्याची काळजी वाटू लागली. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास दोघे जण एरिकच्या घरी पोहोचले. त्याची विचारणा करू लागले. त्याच्या आईच्या फोनवरूनच त्याच्या मित्राशी संपर्क साधून ‘तो कुठे आहे? त्याची रिपेरी करायची आहे!’ असे धमकावण्यात आले. त्यावेळी आईने त्याच्या मित्रांशी संपर्क साधून त्याच्याविषयी चौकशी केली. कसलीच माहिती तिला मिळाली नाही. मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती घरात येऊन थडकली. पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला पुढील तपास करीत आहेत.









