प्रतिनिधी/ वास्को
वास्को दाबोळीतील महामार्गावर कारने ठोकरल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला. मात्र, मृतदेह सकाळी आढळून आला. सदर युवकाला ठोकरून पसार झालेल्या कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मयत युवकाचे नाव निखिल शाजू (23) असे असून तो मुळ केरळचा आहे. सध्या तो दाबोळीत राहात होता.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दाबोळीतील महामार्गावर मंजूनाथ एअरलॉन्जसमोर शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला. मयत निखिल शाजू हा युवक दाबोळी विमानतळावर काम करीत होता. रात्री आपल्या घरी जाताना त्याला एका कारने ठोकरले. मात्र, कारचालकाने त्या युवकाची चौकशी न करताच घटनास्थळावरून पलायन केले. कारच्या ठोकरीने मयत युवक रस्ता दुभाजकाच्या मध्येच पडला होता. त्यामुळे या महामार्गावरून ये जा करणाऱ्या इतर वाहनांनाही मृतदेह दिसला नाही. सकाळी मयताच्या काही ओळखीच्या व्यक्तीनाच त्याचा मृतदेह दिसला. त्यामुळे विमानतळाच्या रूग्णवाहिकेतून मृतदेह चिखलीच्या उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर हॉस्पिटलकडून ही माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अपघात स्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी वाहनाची तुटलेली क्रमांक पट्टी व इतर काही गोष्टी सापडताच मयत युवकाला अज्ञात वाहनाने ठोकरल्याचे उघडकीस आले.
पळालेल्या कारचालकाचा शोध घेण्यास पोलिसांना यश
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यास यश आले. युवकाला ठोकरून पसार झालेल्या कार चालकाचे नाव संदीप मालवणकर (38) असे असून तो बायणातील राहणारा आहे. पोलिसांनी त्याच्या गुन्हा नोंद केलेला असून त्याची कारही ताब्यात घेण्यात आली आहे. वास्को पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









