ओटवणे प्रतिनिधी
पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे कोलगाव निरुखे येथील नारायण उर्फ प्रसाद व्यंकोजी राऊळ (४२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रसाद राऊळ हा तरुण बुधवारी सायंकाळी उशिरा घराबाहेर पडला होता. मात्र उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. गुरुवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती या तरुणाचे काका आनंद नारायण राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात देताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार अनिल धुरी, संतोष गेलोले यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वर काढून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी कोलगावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सदर तरुणाचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आल्याने आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ, बहिणी, काका, काकी असा परिवार आहे.
Previous Articleज्येष्ठ वकील ॲड. श्रीधर पराडकर यांचे निधन
Next Article राज्य विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्गचा डंका









