प्रतिनिधी /फोंडा
तिस्क फोंडा येथे दुचाकी अपघातातील जखमी दुचाकीचालकाचे बांबोळी येथील गोमेकॉत उपचार घेत असताना गुरूवारी रात्री निधन झाले. सपनेश दिलीप पोकळे (32, मूळ उंडीर-बांदोडा रा. तिस्क-फोंडा) असे त्याचे नाव आहे. सदर अपघाताची घटना शनिवार 18 जून रोजी घडली होती.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिस्क फोंडा येथे प्लेजर दुचाकी जीए 08 पी 5888 ने मयत सपनेशच्या स्प्लेन्डर जीए 05 के 0105 जोरदार धडक दिली होती. त्यात सपनेश गंभीर जखमी झाला होता. अत्यवस्थ अवस्थेत त्याला बांबोळी येथील गोमेकॉत रवानगी करण्यात आली होती. गोमेकॉत उपचार घेत असताना गुरूवारी 23 रोजी उशिरा रात्री त्याचे निधन झाले. याप्रकरणी अपघातानंतर मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालक राजेसाब दस्तगिर शवन्नावर यांच्याविरोधात भा.दं. सं. 279, 338 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून हवालदार केशव सिनारी अधिक तपास करीत आहे.
मयत सपनेश हा अंत्यत मनमिळावू स्वभावी युवक होता. प्रवासी बसवर तो चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या पार्थिवावर काल शुक्रवारी वारखंडे फोंडा येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित मोठा भाऊ असा परिवार आहे.









