विपुल पेडणेकर यांचे संगीत क्षेत्रात नाव : ‘रॉकी और रानी..’ चित्रपटासाठी म्युझिक कंपोझर असिस्टंट म्हणून योगदान
कारवार : गेल्या शुक्रवारी येथील गीतांजली चित्रपटगृहात बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या अभिनयाने नटलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात आला. चित्रपटाच्या शेवटी दाखविलेल्या टायटल्समध्ये कारवार तालुक्यातील सदाशिवगड येथील एका युवा कलाकाराचे नाव पाहून प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. कोण आहे हा युवा कलाकार, या युवा कलाकाराने या चित्रपटावर अशी कोणती भूमिका पार पडली आहे? जेणेकरून त्यांच्या नावाचा टायटल्समध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्या युवा कलाकाराचे नाव विपुल ज्ञानेश्वर पेडणेकर असे आहे. त्याचे नाव एकदम चर्चेत येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याने ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटाचे म्युझिक कंपोझर राहुल तिवारी यांचे असिस्टंट या नात्याने हातभार लावला आहे. विपुल पेडणेकर याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट.
सदाशिवगडच्या मातीत जन्म घेतलेल्या अनेक कलाकारांनी कीर्तन गायन, वादन, मूर्तिकार, अभिनय आदी क्षेत्रे गाजविली आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री जिने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. त्या जयश्री गडकर यांच्या सदाशिवगडच्या (कणसगिरी) कलाकारांचा मोठा वारसा लाभलेल्या आचारीवाडी सदाशिवगड येथे ज्ञानेश्वर पेडणेकर आणि दीपा पेडणेकर यांच्या पोटी विपुल यांचा जन्म झाला. विपुल याने बीसीसीएचा कोर्स पूर्ण केला आहे. तथापि, त्याचा संगीताकडील ओढा पाहून त्याला सदाशिवगड येथील कीर्तनकार आणि संगीत शिक्षक दिनेश गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तबला, हार्मोनियम वादनाचे प्रशिक्षण देण्यास सुऊवात करण्यात आली. गिटार वादनात अधिक रस असलेल्या विपुलने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना किबोर्ड आणि गिटार वादनाचे धडे गिरविले. शिवाय येथील डेवीड यांच्या मार्गदर्शनाखाली गिटार वादनाचे प्रशिक्षण घेतले. पुढे त्याने लंडन येथील ट्रिनीटी स्कूल ऑफ म्युझिकलतर्फे घेतलेल्या चौथा ग्रेड परीक्षा दिली. ही परीक्षा मडगाव-गोवा येथे घेतली जाते. येथील रिदम बीट हर्ट (ताल हृदयाचा ठोका) कडूनही विपुलला प्रोत्साहन मिळत गेले. संगीत क्षेत्रातच करिअर करण्याच्या उद्देशाने विपुलने मुंबई गाठली आणि तेथे मिक्स अॅण्ड मास्टर प्रोग्रॅमचे प्रशिक्षण घेतले. तथापि कोरोना महामारीमुळे त्याला गावी परतावे लागले. कोरोना कालावधीत त्याने आपला भाऊ तुषार व स्थानिक युवा उदयोन्मुख कलाकारांच्या मदतीने संगीत क्षेत्राशी निगडित काही व्हिडिओ तयार केले होते.
फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मुंबई गाठली
मुंबईत विपुल पुन्हा एकदा दाखल झाला. मुंबईत संगीत क्षेत्रात वावरणाऱ्या रोनाल्ड फर्नांडीज यांनी विपुलची संगीत कंपोझर राहुल तिवारी यांची ओळख करून दिली. पुढे तिवारी यांनी राहुलला संगीत क्षेत्रातील विशेष करून वादनातील बारकाव्यासह प्रोफेशनल प्रशिक्षण दिले. आणि शेवटी ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातील संगीत कंपोझर म्हणून सेवा बजावताना तिवारी यांनी विपुलला आपला असिस्टंट होण्याची संधी प्राप्त करून दिली.









