सहकारी जखमी, वेर्णा येथील घटना
प्रतिनिधी /वास्को
वेर्णा भागात दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला युवक ठार झाला. या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. मयत युवकाचे नाव विठोबा म्हाळकर (वय 23) असे असून जखमी युवकाचे नाव स्वप्नील सोलेकर (वय 22) असे आहे.
वेर्णा पालिसांकडून या अपघातासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास वेर्णातील जुने पंचायत घर ते कुंबोरडा भागादरम्यानच्या रस्त्यावर झाला. स्वप्नील सोलेकर हा यामाहा (केए-65-ई-3975) ही दुचाकी चालवत होता तर विठोबा म्हाळकर हा दुचाकीवर मागे बसला होता. दोघेही रात्री कंपनीतून सुटल्यावर राहत्या घरी जात होते. रात्रीची वेळ असल्याने भरधाव निघालेल्या दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा गेल्याने दोघेही रस्त्यावर कोसळल्याने जखमी झाले. मात्र, विठोबा हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू आला. स्वप्नील हा या अपघातात किरकोळ जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचारानंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले.
मयत व जखमी दोघेही रामनगरचे रहिवासी
मयत विठोबा व जखमी सोलेकर हे दोघेही मित्र असून ते वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यामुळे वेर्णातील कुंबोरडा भागात ते राहात होते. दोघेही मुळचे रामनगर (कर्नाटक) चे रहिवासी आहेत. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन हाकल्यासंबंधी दुचाकी चालकावर गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक डायगो ग्रासिएस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संकेत तळकर अधिक तपास करीत आहेत.









