कार चालकाविरोधात पोलिसात गुन्हा नोंद
बेळगाव : भरधाव कारच्या ठोकरीने पादचारी जागीच ठार झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काकती पोलीस ठाण्याजवळ बुधवारी सकाळी हा अपघात घडला आहे. काकती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. राजू अशोक मठपती (वय 38) रा. मठ गल्ली, काकती असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास बेळगावहून संकेश्वरकडे जाणाऱ्या केए 49, एम. 6927 क्रमांकाच्या कारने ठोकरल्याने राजू जागीच ठार झाला. कारचालक उमेश होळेण्णावर, मूळचा रा. बगरनाळ, सध्या रा. कंग्राळी बी. के. याच्यावर काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.









