देवरूख प्रतिनिधी
देवरुख संगमेश्वर तालुक्यातील मेघी येथे बावनदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या देवरूख येथील २९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी घडली. अभिषेक सदानंद शेट्ये असे त्याचे नाव आहे. तो मनसे विद्यार्थी सेना, देवरूख शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता.
अभिषेक हा प्रसाद या टोपण नावाने सर्वांच्या परिचयाचा होता. तो गेली १० वर्षे सोळजाई एंटरप्रायझेस या नावाने मोबाईल शॉपी व्यवसाय चालवत होता.
अभिषेक व मित्रांनी शनिवारी मेघी येथे पोहण्यासाठी जाण्याचा बेत आखला. दुपारी ३.३० वाजता ते मेघी पूल येथे पोहण्यासाठी गेले. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. ही घटना नागरिक व मनसे कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी तात्काळ धाव घेतली.आणि त्याला देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.