कास वार्ताहर
महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील उचाट गावच्या हद्दीतील सातवीन पेढा वस्तीतील मंगेश धोंडीबा ढेबे (वय १८) या युवकाचा दरड कोसळल्याने त्याखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दि.२० रोजी सायंकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने कांदाटी खोऱ्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून विजांचा कडकडाट,ढगांच्या गडगडाटात येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सातवीन पेढा वस्तीतील मंगेश धोंडीबा ढेबे हा युवक घरातील जनावरांच्या गोठ्यात खड्डे भरण्यासाठी मुरुम आणायला जवळच असणाऱ्या डोंगरात गेला. बराच वेळ होवून ही मंगेश घरी न आल्याने त्याचा भाऊ त्याच्या शोधासाठी तिकडे गेला असता मंगेशच्या अंगावर दरड कोसळल्याचे आढळले. त्यानंतर वस्तीतील इतर लोकांना सांगून त्याला घरी आणण्यात आले. घरी पोहोचण्यापूर्वीच तो मयत झाला होता. ह्या घटनेची माहिती गाव कामगार कोतवाल यांनी तलाठी राजू वंजारी यांना दिली. तलाठी वंजारी यांनी कुटुंबियांना त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह महाबळेश्वरला आणण्यास सांगितले. परंतु बिकट स्थानिक परिस्थिती व अज्ञान यामुळे लोकांनी कोणतेही शासकीय सोपस्कार पार पाडले नाहीत. याबाबत तलाठी राजू वंजारी यांना सविस्तर विचारले असता पंचनामा व शवविच्छेदन आदी बाबी न झाल्याने शासकीय मदत मिळणार नाही असे सांगितले.
याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी परिस्थितीचा विचार करून गरिब कुटुंबातील एका नवयुवकाच्या या अपघाती मृत्यू बाबत सहानुभूतीने विचार करून शासकीय मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मंगेशवर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेश ढेबे च्या पश्चात कुटुंबात मोठा भाऊ,आई,वडील असा परिवार आहे.