ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच पुण्यातील सदाशिव पेठेत एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर आज सकाळी कोयत्याने हल्ला करण्यात आला. यावेळी एका विद्यार्थ्याने धाडस दाखवत या तरुणीला हल्लेखोरापासून वाचवले. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
शंतनू जाधव (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहाच्या सुमारास एमपीएससी करणारी एक तरुणी तिच्या मित्रासोबत निघाली होती. त्यावेळी हल्लेखोर शंतनू याने या दोघांना अडवले आणि बॅगेतून कोयता काढून हल्ला चढविण्यास सुरूवात केली. त्यावेळी तरुणी आणि तिचा मित्र जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन पळू लागले. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढय़ात लेशपाल जवळगे नावाचा एमपीएसी करणारा दुसरा विद्यार्थी तरुणीच्या मदतीला आला. त्याने हल्लेखोर जाधवच्या हातातील कोयता पकडून त्याला चोप दिला. नंतर दोघांनीही या हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्लेखोर शंतनूचे संबंधित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला आहे. तरुणीने नकार दिल्यानंतरही तो सतत तिचा पाठलाग करत होता. सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, अशी माहिती समोर आली आहे.








