स्टेशन रोडवरील घटना, सराईत गुन्हेगारास अटक
प्रतिनिधी/मिरज
शहरातील स्टेशन रोड येथे पान टपरी फोडल्याच्या कारणातून तरुणाला बेदम मारहाण करत खून करण्यात आला. जिलानी इसामुद्दीन कुडचीकर (वय 47, रा. बागलकोट, कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार गणेश खन्ना नायडू (वय 31, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) याला महात्मा गांधी चौथी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, गणेश नायडू व मयत जिलानी कुडचीकर हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, एकमेकांच्या ओळखीचे होते. स्टेशन रोडवर गणेश याची पान टपरी आहे. जिलानी कुडचीकर गुरुवारी रात्री गणेश याच्या पान टपरी जवळ आला. त्याने गणेशकडून काही रक्कम घेऊन तेथून निघून गेला होता.
परंतु, शुक्रवार रोजी पहाटे जिलानी याने गणेश याची पान टपरी फोडून दुकानातील साहित्य विस्कटून काही रोख रक्कम व सिगारेट पाकीट चोरून नेल्याबाबत गणेश याला माहिती मिळाली होती. संतापलेला गणेश हा मध्यरात्रीपासूनच जिलानी याच्या मागावर होता. शुक्रवारी पहाटे जिलानी हा रेल्वे स्थानक रस्त्यावरील एका मंदिरासमोर आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर गणेश नायडू देखील त्या ठिकाणी आला. यावेळी गणेश याने जिलानी याला पान टपरी फोडल्या बाबत विचारणा केली. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारीचा प्रकार घडला. गणेश याने जिलानी याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे जिलानी बेशुद्ध झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे जिलानी कुडचीकर याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित गणेश नायडू याला अटक केली आहे. पानपट्टी फोडून चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाचा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.