खेड / राजू चव्हाण :
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावर जीवघेणा प्रवास सुरू आहे. आतापर्यंत ४,५२१ जणांचा हकनाक बळीही गेला असतानाही शासन सुस्त आहे. या महामार्गाची दशा पाहून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणी येथील चैतन्य लक्ष्मण पाटील हा २९ वर्षीय तरुण महामार्गावर पायी भ्रमंतीला निघाला आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पनवेल-पळस्पे फाटा येथून पायी सत्याग्रह सुरू करत आतापर्यंत ४५ कि.मी.चे अंतर पार केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत तो पायी प्रवास करणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या आजवर देण्यात आलेल्या ‘डेडलाईन’ हवेतच विरल्या आहेत. केवळ गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी सार्वजनिक बांधकाममंत्री महामार्गाचा पाहणी दौरा करत पाहणीचे सोपस्कार पार पाडण्याची परंपरा कायम ठेवत आहेत. दरवर्षी देण्यात येणाऱ्या आश्वासनांवर पाणी फेरत असल्याने चाकरमान्यांचा वनवास अजूनही कायम आहे. महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी खड्ड्यांचे साम्राज्य, सर्व्हिस रोड, ओव्हरब्रीजची कामे अजूनही प्रलंबित आहेत. यामुळे महामार्गाचे काम नेमके कधी पूर्ण होईल, याची हमी दस्तुरखुद्द प्रशासन देऊ शकत नाही. रखडलेल्या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले आहे. तर अनेकांचे संसारही पुरते उद्ध्वस्त झाले आहेत. महामार्गाची दशा पाहण्यासाठी चैतन्य पाटील हा तरुण चक्क पायी प्रवासाला निघाला आहे.
या पायी प्रवासात तो गुगलद्वारे अपडेट घेत संबंधित महामार्गाच्या अभियंत्यांना पाठवत आहे. जेणेकरुन तोच खड्डा तेच लोकेशन असेल यावरुन किमान तो खड्डा भरला जावा, हीच त्याची माफक अपेक्षा आहे. खड्यात गेलेला महामार्ग आणि ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यांची व्हिडीओ शुटींग करण्यात त्याला वेळ लागत आहे. यामुळे पुढील ५०० कि.मी. अंतराचा प्रवास करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील, हे सांगता येणार नाही, असेही तो म्हणाला.
सकाळी ८ वाजता पायी भ्रमंतीला सुरुवात करत अंधार पडेपर्यंत तो पायी प्रवास करतो. यानंतर नजीकच कोणी ओळखीचे असल्यास तेथे वास्तव्य, नाहीतर मंदिरे अथवा रस्त्यालगतच तंबू ठोकत तेथेच रात्र काढत पुन्हा तो पायी प्रवासाला निघत आहे. या प्रवासातील महामार्गावरील सगळ्या खड्यांचे फोटो अपडेट करुन तो प्रशासनासह सरकारलाही पाठवणार आहे. प्रवासात त्याला मानसिक आधार मिळत असून विविध गावचे कार्यकर्ते, सरपंच, सामाजिक संघटना त्याला त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छाही देत आहेत. किमान खड्डे भरले जावेत, अशी अपेक्षा सर्वचजण त्याच्याकडे व्यक्त करत आहेत. निदान गणेशोत्सवापूर्वी तरी खड्डे भरले जावेत व कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, एवढीच अपेक्षा अनेकजण त्याच्याकडे व्यक्त करत असल्याचे त्याने सांगितले.
- पायी प्रवास थांबवण्याची कुणीच तसदी घेतलेली नाही !
महामार्गाच्या बाजूला असणारे सर्व्हिस रोड पूर्णतः खड्ड्यांनी भरले आहेत. महामार्गावर अजूनह पथदीप नाहीत. दोन रस्त्यांमध्ये असणारी दृष्टीस पडत नाहीत. आतापर्यंत महामार्गाच्या एकाही अभियंत्याने पायी प्रवास थांबवण्याची तसदी घेतली नसल्याची खंत चैतन्य पाटील याने व्यक्त केली.








