तिघे बेपत्ता : शोधमोहीम गतिमान
वृत्तसंस्था/ श्रीनगर
लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीला सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी माउंट कुनजवळ हिमस्खलनाचा तडाखा बसला. हिमस्खलनात एक जवान हुतात्मा झाला असून तुकडीतील अन्य तिघे जवान बेपत्ता आहेत. शोधमोहीमेत एका जवानाचा मृतदेह सापडल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले. इतर बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे.
हिमस्खलनाच्या दुर्घटनेत तीन जवान बेपत्ता असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (एचएडब्ल्यूएस) आणि लष्कराच्या आर्मी अॅडव्हेंचर विंगमधील सुमारे 40 जवान लडाखमधील माउंट कुन येथे नियमित प्रशिक्षण क्रियाकलापांमध्ये सहभागी झाले असताना हिमस्खलन झाल्याचे सांगण्यात आले.
‘टेन द टेनर’ संकल्पनेअंतर्गत सैनिकांना गिर्यारोहण प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने अशाप्रकारची सरावसत्रे या हंगामात सुरू असताना सदर तुकडी हिमस्खलनाच्या विळख्यात अडकली. 8 ऑक्टोबरला प्रशिक्षण चढाईदरम्यान लष्कराच्या तुकडीला मोठ्या हिमस्खलनाला सामोरे जावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. या चार लष्करी कर्मचारी हिमनगाखाली अडकले होते. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. धोकादायक शोध मोहिमेदरम्यान हिमस्खलनात अडकलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अजून तिघांचा शोध सुरू असून बचाव मोहीम अजूनही सुरू आहे.









