वारणानगर, प्रतिनिधी
Kolhapur Suicide News : मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, मी कुठेही सापडणार नाही, तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही अशा मजकूराचा संदेश मोबाईल स्टेटसवर सोडून तरुणाने वारणा नदीपात्रात वाहत्या पाण्यात उडी घेतली. ही घटना बच्चे सावर्डे – मांगले बंधाऱ्यावर शनिवार दि.5 रोजी सायकांळी घडली. तुषार गणपती पांढरबळे (वय -24) मूळ गाव बिळाशी सध्या राहणार मांगले ता. शिराळा असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी दिवसभर सांगलीच्या एनडीआरएफ च्या पथकाने वारणा नदीपात्रात सुमारे पाच किलोमीटर दोन बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली परंतु सायंकाळपर्यंत तुषार न सापडल्यामुळे शोध थांबवण्यात आला सोमवारी पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम घेण्यात येणार आहे.
तुषारने शनिवारी सायंकाळी मांगले बच्चे सावर्डे बंधाऱ्यावरून थेट वारणा नदी पात्रात वाहत्या पाण्यात उडी घेण्यापूर्वी बंधाऱ्यावर मच्छीमार करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने स्वताला पाण्यात झोकून दिले. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणारा तुषार मांगले येथे मामाकडे काही वर्षापूर्वी आला होता.सध्या तो खोली भाड्याने घेऊन आई सोबत राहत होता.शनिवारी सायंकाळी मांगले – सावर्डे बंधाऱ्याकडे गेला.त्यावेळी तो मोबाईलवर बोलत गेला होता.बंधाऱ्यावर गेल्यानंतरही तो मोबाईलवर बोलत होता.मी उडी घेतोय असे बंधाऱ्याच्या काठावर जाऊन त्याचा संवाद सुरु होता.त्यावेळी मच्छीमार करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने स्वताला पाण्यात झोकून दिले.वारणा नदीला पुराच्या पाण्याचा मोठा प्रवाह असल्यामुळे तुषार उडी मारल्यानंतर काही क्षणात नदीच्या पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला. दरम्यान मांगलेचे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील घटनास्थळी आले.
वारणा नदीचे पात्र मोठे व मोठा प्रवाह असल्यामुळे तुषारला शोधणे अवघड झाले होते बंधा-याच्या खाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे तो किती लांब गेला आहे हे समजणे कठीण होते.त्यामुळे रविवारी सकाळी सांगलीच्या एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले.रविवारी दिवसभर मांगले पुलापासून ते वाळवा तालुक्यातील चिकुर्डे पुलापर्यंत पाच किलोमीटर वारणा नदीपात्रात दोन बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. परंतु सायंकाळपर्यंत तुषार न सापडल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली सोमवारी पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम घेण्यात येणार आहे.यावेळी एनडीआरएफ पथकाचे प्रमुख राजेश येवले आणि त्यांच्या वीस जवानाच्या पथकाने ही शोधमोहीम राबवली.यावेळी घटनास्थळी मांगल्याचे सरपंच प्रल्हाद पाटील,उपसरपंच संजय जमदाडे,वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील,माजी उपसरपंच धनाजी नरुटे,तसेच शिराळा आणि कोडोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.