नेटवर्क मार्केटिंग बिझनेसच्या नावाखाली मोटारसायकल, सोन्याच्या चेनसह साडेतीन लाखांचा चुना
बेळगाव : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परिचित झालेल्या एका महिलेने नेटवर्क मार्केटिंग बिझनेससंबंधीची बैठक आहे, असे सांगत वैभवनगर येथील एका तरुणाची मोटारसायकल, मोबाईल व सोन्याची चेन पळविल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ख्वाजा मैनुद्दीन दिलावर नदाफ (वय 22) मूळचा राहणार पाच्छापूर, ता. हुक्केरी, सध्या राहणार वैभवनगर, झटपट गल्ली या तरुणाने टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 5 मे रोजी दुपारी 2 ते 2.15 यावेळेत हिंदवाडी येथील एका लॉजवर बोलावून घेऊन त्या महिलेने 3 लाख 35 हजार रुपये किमतीचे साहित्य पळविले आहे.
‘इट इज मी दिया’ अशी प्रोफाईल असणारी सुमारे 45 वर्षीय महिलेची ख्वाजा मैनुद्दीनशी ओळख झाली होती. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर ‘नेटवर्क मार्केटिंग बिझनेससंदर्भात बैठक आहे. तुम्ही हिंदवाडीत या’ असे सांगत सोमवार दि. 5 मे रोजी दुपारी हिंदवाडी येथील एका लॉजवर ख्वाजा मैनुद्दीनला बोलावून घेतले. वॉशरूमला जाऊन येईपर्यंत ख्वाजा मैनुद्दीनची मोटारसायकल, त्याची सोन्याची चेन व मोबाईल घेऊन या 45 वर्षीय महिलेने तेथून पळ काढल्याची माहिती मिळाली आहे. 20 मे रोजी यासंबंधी एफआयआर दाखल झाला असून टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी पुढील तपास करीत आहेत.









