बेळगावात आगमन : माळमारुती पोलिसांकडून स्वागत
बेळगाव : प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या एका चाहत्याने सायकलवरून जगभ्रमंती सुरू केली आहे. तामिळनाडूतील हा तरुण सोमवारी सायकलवरून बेळगावात दाखल झाला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्याचा हा उपक्रम सुरू आहे. पुल्लाची (जि. कोईमतूर) येथील मुत्तू सेल्वम हा तरुण 21 डिसेंबर 2021 पासून सायकलवरून भ्रमंती करत आहे. सोमवारी सायंकाळी माळमारुती पोलीस स्थानकात या तरुणाचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छाही देण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुत्तू सेल्वमला शुभेच्छा दिल्या.
मुत्तू सेल्वम यांची पत्नी आजारी असताना कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांनी आपल्याला मदत केली होती. त्यानंतर त्यांचे आभार मानणे शक्य झाले नव्हते. आभार मानण्याआधीच अप्पुचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यातील दानशूरता जगभर पोहोचविण्यासाठी आपण सायकल प्रवास सुरू केला आहे. ज्या गावात पोहोचतो, तेथे रोपटे लावण्याचा उपक्रमही सुरू असल्याचे मुत्तू सेल्वम यांनी सांगितले. नेपाळ, बांगलादेश, व्हिएतनाम आदी देशांचा प्रवास आपण पूर्ण केला असून भारतातील विविध राज्यात भ्रमंती करणार आहे. 5 जानेवारी 2025 रोजी इंडिया गेटजवळ या सायकल प्रवासाचा समारोप होणार आहे. त्यांच्या सायकलला जीपीएस यंत्रणा बसविली आहे. प्रत्येक जिल्ह्यात तेथील जिल्हाधिकारी व पोलीसप्रमुखांची भेट घेऊन त्यांची स्वाक्षरीही घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी 23 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास पूर्ण केला आहे. या काळात 3 लाख 12 हजार 600 हून अधिक रोपट्यांची त्यांनी लागवड केली.









