गृहोद्योगाच्या नावाखाली फसवणूक : शहापूर पोलिसांत संशयिताविरोधात तक्रार दाखल
बेळगाव : घरबसल्या कामे देण्याचे सांगून सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाने बेळगाव परिसरातील आठ हजारहून अधिक महिलांना ठकवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्याच्यावर शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खासबाग येथील लक्ष्मी आनंद कांबळे या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब लक्ष्मण कोलेकर याच्यावर शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ‘घरबसल्या अगरबत्ती पॅक करून द्या आणि नफा मिळवा’ असे सांगत बाबासाहेबने बेळगाव परिसरातील आठ हजारहून अधिक महिलांना गंडवल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील बाबासाहेब कोलेकर हा बेळगाव परिसरात अजय पाटील या नावानेही ओळखला जात होता. शिवाजीनगर येथे बी. एम. ग्रुप महिला गृहोद्योग समूह या नावाने एक कार्यालय सुरू करून घरात बसून अगरबत्ती पॅक करून द्या आणि पगार मिळवा, असे सांगत त्याने महिलांचा विश्वास संपादन केला होता.
एका महिलेच्या नावे आयडी तयार करायला 2 हजार 500 रुपये घेतले जात होते. 20 दिवसांनंतर 3 हजार रुपये देण्याचे सांगण्यात आले होते. याबरोबरच पुढील सहा महिने काम देऊन पगार देण्याचेही त्याने विश्वास दिला होता. लक्ष्मी कांबळे यांनी आपल्या नावे 20 आयडी तयार करण्यासाठी 17 जुलै 2025 रोजी त्याला 50 हजार रुपये दिले होते. 8 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या सासूच्या नावे 10 आयडी तयार करण्यासाठी 25 हजार रुपये दिले होते. त्याच्या बदल्यात त्यांना अगरबत्ती देण्यात आल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पॅक करून लक्ष्मी व त्यांच्या कुटुंबीयांनी बाबासाहेब कोलेकरला पोहोचविले. 20 दिवसांनंतर पगार विचारण्यासाठी गेले, त्यावेळी आज देतो, उद्या देतो असे सांगत त्याने टाळाटाळ केली. शेवटी शिवाजीनगर येथील कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्याने हे कार्यालय कधीच बंद केल्याची माहिती मिळाली. त्याचा फोनही स्वीच ऑफ आला. त्यामुळे आपण फसलो गेलो, हे लक्ष्मी यांच्यासह अनेक महिलांच्या लक्षात आले. लक्ष्मी व इतर तीन महिलांनी मिळून 2 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती.









