हातकणंगले :
दुचाकी स्वाराला वळण मार्गाचा अंदाज न आल्याने तटरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. मयत युवकाचे नाव मानस विजय जाधव (वय 22 रा. रुई, ता. हातकणंगले) असे असून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या त्याच्या मित्राचा हात अपघातात तुटला आहे मात्र जखमी मित्राचे नांव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. ही घटना हातकणंगले –रामलिंग मंदिर मार्गावरील रामलिंग फाट्याजवळ एका लॉजसमोर शुक्रवार ता. 13 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाणेत झाली असून , तब्बल 24 तास होऊन सुद्धा हातकणंगले पोलिसांना अपघाताची घटना माहित नव्हती .
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत मानस जाधव हा टेक्सटाईल इंजिनिअर होता. त्यांने नुकतीच नेव्ही दलात निवडीसाठी परिक्षा दिली होती .त्यांची निवड अंतिम टप्प्यात आली होती . शुक्रवार ता. 13 रोजी रामलिंग फाट्यानजीक एका लॉज नजीकच्या वळणाचा अंदाज न आल्याने मयत मानस जाधव यांच्या दुचाकीची भिंतीला जोरदार धडक बसली. यामध्ये मयत मानससह मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला . जखमींना तात्काळ इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . पण उपचारादरम्यान मानस विजय जाधव यांचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई , वडील , बहीण असा परिवार आहे.








