हेल्मेट तपासणीवेळी पोलिसांची अरेरावी : नागरिकांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केले नाही म्हणून पोलिसांनी मिरज येथील एका तरुणाला त्याच्या आईसमोर बेदम मारहाण केल्याची घटना अंकली (ता. चिकोडी) येथे शुक्रवारी घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस दलाने मात्र मारहाण केली नसल्याचे सांगितले आहे.
हेल्मेट व कागदपत्रांची तपासणी करण्याच्या निमित्ताने पोलीस दलाकडून वाहन चालकांचा छळ केला जातो. एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूनंतर तपासणी कशी करावी, यासंबंधी राज्य पोलीस महासंचालकांनी संपूर्ण राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊनही तपासणीच्या नावाखाली पोलिसांची दमदाटी, अरेरावी सुरूच आहे. त्यामुळे वाहनचालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आजारी आजीला बघण्यासाठी मिरजेहून चिकोडीला जाताना ही घटना घडली आहे.
जुना बुदगाव रोड, मिरज येथील ऋषीकेश गजानन लिंबीगिडद हा तरुण आईसमवेत मोटारसायकलवरून चिकोडीकडे जात होता. अंकली पोलीस स्थानकाजवळ मोटारसायकल अडवून त्याला विचारणा करण्यात आली. हेल्मेट नसल्यामुळे त्याला 500 रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. ऋषीकेशने आपल्याजवळ 500 रु. नाहीत, 200 रुपये आहेत, असे सांगितल्यामुळे पोलीस व ऋषीकेश यांच्यात वादावादी झाली.
वादावादीनंतर पोलिसांनी आईसमोर ऋषीकेशला बेदम मारहाण केली आहे. मुलाला मारहाण होताना पाहून सोडविण्यासाठी गेलेल्या आई सुशिला यांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली आहे. ऋषीकेशच्या अंगावरील कपडे फाडून त्याला मारहाण करण्यात आली असून नंतर त्याला चिकोडी येथील तहसीलदारांसमोर हजर करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर उलट त्याच तरुणावर अंकली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती एन. एस. यांनी या घटनेसंबंधी एका पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. हेल्मेट नसल्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाला 500 रु. दंड भरण्यास सांगितले. त्याने 200 रु. देण्याचे कबूल केले. कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या पोलिसांबरोबरच त्याने अरेरावी केली असून त्याला मारहाण केली नसल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले आहे.
वरिष्ठांना कधी जाग येणार?
हेल्मेट व कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली पोलीस वाहनचालकांची अक्षरश: लूट करतात. अथणी, चिकोडी, अंकली, कागवाड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून वसुली केली जाते. अथणी येथील अनंतपूर रोडवर नेहमी वाहन तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांना लुटण्यात येते. पोलीस मुख्यालय बेळगावात आहे. त्यामुळे आम्ही करू तीच कारवाई या थाटात वावरणाऱ्या काही अधिकारी व पोलिसांमुळे पोलीस खाते बदनाम होत आहे. बेंगळूरप्रमाणेच बेळगावातही एखाद्या वाहनचालकाचा बळी गेल्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









