प्रतिनिधी
बांदा
गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कारवाई केली. यात ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांच्या दारुसह एकूण ११ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गणपत प्रभाकर माईंडकर (२८, रा. कोलगाव चाफेली) याला अटक करण्यात आली. जुन्या मुंबई – गोवा महामार्गावर आरोसबाग फाट्यावर ही कारवाई करण्यात आली.
गोव्यातून सिंधुदुर्गात बेकायदा दारु वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार बांदा – पत्रादेवी रोडवर आरोसबाग फाट्यावर पथकाने सापळा रचला होता. गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एमएच ०६ एएफ २४४८) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये तब्बल ८५ दारुचे बॉक्स आढळून आले. विदेशी ब्रँडच्या ७५० मिलीच्या ९०० बाटल्या व १८० मिलीच्या ४८० बाटल्या जप्त करण्यात आल्या. ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांची दारु व ६ लाख २५ हजारांची कार असा एकूण ११ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.









