बेळगाव-चोर्ला मार्गावर बामणवाडी क्रॉसजवळ दुचाकीस्वाराला समोरासमोर धडक
वार्ताहर/किणये
सुसाट धावणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला समोरासमोर जोराची धडक दिल्यामुळे किणये गावातील एक तरुण ठार झाला. सदर अपघात गुरुवारी रात्री 9.30 च्या दरम्यान बेळगाव-चोर्ला मार्गावर बामणवाडी क्रॉस येथे घडला. सूरज दीपक पाटील (वय 31, रा. किणये) असे अपघातामध्ये ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. यामुळे किणये परिसरात शोककळा पसरली असून ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सूरज पाटील हा गुरुवारी रात्री कामावरून उद्यमबागहून किणये गावाकडे दुचाकीवरून येत होता. यावेळी गोव्याहून एक मालवाहू ट्रक भरधाव बेळगावकडे जात होता. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भयानक होता की सदर दुचाकीस्वार सुमारे 50 फुटापर्यंत फरफटत गेला आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबाला जावून धडकली. सूरज हा उद्यमबाग येथील एका खासगी कंपनीत कामाला होता, अशी माहिती त्याचे काका अनिल पाटील यांनी दिली. ट्रकने धडक दिल्यामुळे सूरजचे दोन्ही पाय निकामी झाले. तसेच त्याच्या छातीला व हातांना जबर मार बसला होता. अपघातानंतर सूरजला बेळगावमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. सिव्हिल इस्पितळात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी दुपारी 3 वाजता किणये स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सूरजच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 26 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.
अपघाताच्या घटना वारंवार
पिरनवाडी ते किणये गावापर्यंतचा रस्ता अपघात झोन बनला आहे. बेळगाव-चोर्ला रस्त्यावरून गोव्याला ये-जा करणारी वाहने नेहमीच सुसाट जातात. यामुळे यापूर्वीही अनेक अपघात या रस्त्यावर घडले आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गावांजवळ वाहनधारकांवर वेगमर्यादा असणे गरजेचे आहे. या वेगमर्यादाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.









