रत्नागिरी / प्रतिनिधी :
किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी चिपळूणमधील तरुणाचे तिघांनी अपहरण केले. त्यानंतर त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली होती. पोलिसांनी दोन तासांत खून करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली.
सौरभ शैलेंद्र मयेकर ( २१, मूळ गाव रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. सध्या रा. एक्झारबीया सोसायटी, जांभूळ, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सक्षम शंकर आनंदे (१८, रा. व्हिजन सिटी, जांभूळ) व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे.
सौरभ तळेगाव दाभाडे येथे नोकरीनिमित्त वास्तव्याला होता. सोमवारी रात्री किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघांनी सौरभचे अपहरण केले. तसेच त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. ही घटना चिपळूण तालुक्यात समजताच अनेकांनी पुण्यात धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हालवत तीन आरोपींना अटक केली आहे.









