कोल्हापूर :
मंगळवार पेठेतील, खासबाग चौक रिक्षा स्टॉप समोर महापालिकेकडून ड्रेनेजच्या चेंबर दुरूस्तीसाठी खड्डा काढला आहे. वास्तविक खड्ड्याच्या चारीही बाजूने बॅरेकट्स लावणे आवश्यक होते. परंतू मनपाने असे केले नसल्याने सोमवारी सकाळी एक तरूण दुचाकीसह सांडपाण्याने भरलेल्या या चार फुट खड्ड्यात कोसळला.
खासबाग चौक येथे वारंवार महापालिकेची ड्रेनेजलाईन तुंबते. यातून परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे महापालिकेने येथील रिक्षा स्टॉप समोरील असणाऱ्या बामणे गल्लीच्या वळणावरच चेंबर दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी खड्डा काढण्यात आला होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून येथील काम सुरू आहे. यामुळे सुमारे चार फुट खड्ड्यात सांडपाणी साचले होते. वास्तविक महापालिकेने या ठिकाणी चारही बाजूने बॅरेकटींग करणे आवश्यक होते. परंतू एका बाजूनेच बॅरेकट लावले होते. सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील साठमारी येथील रहिवाशी असणारे दिग्वीजय उदय बोंद्रे हे नेहमी प्रमाणे सकाळी 11 च्या सुमारास दुचाकीवरून भवानी मंडप येथील त्यांच्या नाष्टा सेंटरकडे जात होते. शिवाजी स्टेडियमकडून भवानी मंडपाकडे जात असताना खासबाग चौक, बामणे गल्ली येथे तो आला असता दुरूस्तीसाठी खोदलेल्या चेंबरच्या खड्ड्याच्या येथे त्याचा एका बाजूला तोल गेला. यामध्येच तो दुचाकी वाहनासह चार फुट सांडपाणी असणाऱ्या खड्ड्यात वाहनासह कोसळला. दिग्वीजय तत्काळ खड्ड्यातून बाहेर आला. यामध्ये सुदैवाने त्यास मोठी दुखपात झाली नाही. परंतू दुचाकी पूर्ण सांडपाण्यात बुडाली. याची माहिती दिग्वीजयचे वडील उदय बोद्रे यांना समजली. ते तत्काळ या ठिकाणी आले. त्यांनी त्या परिसरात असणाऱ्या लोकांच्या मदतीने खड्ड्यात पडलेली दुचाकी दोरीने बांधून वर काढली. यानंतर दिग्वीजयच्या कुटूंबियांनी त्यास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले.
- मनपाला उशीरा सुचले शहाणपण
चेंबर दुरूस्तीसाठी खोदलेला चार फुट खड्ड्यात कोणीही पडणार नाही म्हणून वास्तविक मनपाने काम सुरू केल्यानंतर त्वरीत चारही बाजूने बॅरेकटस लावणे आवश्यक होते. केवळ गल्लीच्या कोपऱ्यालाच बॅरेकट लावण्यात आले. रात्रीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक या परिसरातून ये–जा करत असतात. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास हा खड्डा दिसून येत नाही. यामध्ये मोठी दुर्घटना घडू शकते. वास्तविक या ठिकाणी मनपाने काम सुरू असल्याचे फलक लावणे, रात्र्घच्यावेळी लाल दिवा लावून ठेवणे, बॅरेकटसह चारीही बाजून फित लावण्याची आवश्यकता होती. मात्र, प्रशासनाकडून यासंदर्भात दुर्लक्ष केले. दिग्वीजय बोंद्रे सोमवारी दुचाकीसह खड्ड्यात पडल्यानंतर अखेर मनपाने खड्ड्याच्या चारीही बाजूने बॅरेकट लावले.
- ड्रेनेजची कामे तत्काळ करणे आवश्यक
शहरामध्ये महापालिकेची 40 वर्षापूर्वीची ड्रेनेजलाईन आहे. लोकसंख्या वाढल्याने ड्रेनेजलाईनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी जाते. त्यामुळे शहराच्या सखल भागात वारंवार ड्रेनेज तुंबलेले असतात. महापालिकेकडून काही ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन आणि चेंबर बसविण्याचे काम सुरू केले आहे. ही कामे तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. खासबाग चौकातील हे काम गेले चार ते पाच दिवस सुरू होते. अशाच प्रकारे शहरात काही रस्त्यावर चेंबरची उंची जास्त असून चेंबरचे झाकण रस्त्यावर आली आहेत, अशी चेंबर अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.
- दुचाकी बुडल्याचा व्हिडीओ व्हायरल
शहराच्या मध्यवस्तीमध्ये चार फुट ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याचा व्हिडीओ सोमवारी दिवसभर व्हायरल झाला. सांडपाण्यातून दुचाकी काढत असणाऱ्या व्हिडीओ पाहून मनपा विरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
- नागरीकांनीही खबरदारी घेण्याची गरज
शहरात ठिकठिकाणी थेट गॅसपाईपलाईन, रस्ते तसेच ड्रेनेजसाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे वाहनधारक अथवा नागरिकांनी अशा खड्ड्याच्या जवळून जाताना दक्षता घेतली पाहिजे. खड्डा खोंदला असताना अरूंद रस्त्याच्या बाजून जावू नये. खड्डा असणाऱ्या परिसरातून न जाता दुसऱ्या मार्गाने जाणे योग्य ठरणार आहे.








