बसरीकट्टी येथील दुर्घटना : गावावर शोककळा
वार्ताहर/सांबरा
परसातील कूपनलिकेतील विद्युतमोटार काढताना विजेचा धक्का लागून सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे रविवारी दुपारी घडली. सुधीर रामा हिरोजी (वय 39) रा. जिजामाता गल्ली, बसरीकट्टी असे दुर्दैवी तऊणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुधीर यांच्या परसातील कूपनलिकेत बिघाड झाला होता. रविवारी सुटी असल्याने तो घरीच होता. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आपली भावंडे व काही सहकाऱ्यांच्या मदतीने कूपनलिकेतील विद्युतमोटार बाहेर काढताना सुधीरला विजेचा जोराचा धक्का लागला. तर त्यांचा एक भाऊ व तिघा मित्रांनाही सौम्य धक्का लागला आहे. त्यानंतर लागलीच सहकाऱ्यांनी त्यांना बेळगाव येथील खासगी दवाखान्याकडे घेऊन गेले. मात्र दवाखान्यात पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे.
ग्रामस्थातून हळहळ
रक्षाबंधनच्या पूर्व- संध्येलाच त्यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधीर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व तीन भाऊ असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ता हरपला
गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे सुधीर नित्य पूजन करायचे. वातील धार्मिक व सामाजिक कार्यात ते आघाडीवर होते. सेंट्रिंग व्यवसाय करून घरचा उदरनिर्वाह करत होते. भावंडांमध्ये सुधीरच मोठा होता. त्याचबरोबर श्रीराम सेना कर्नाटकचा बेळगाव तालुकाध्यक्ष म्हणूनही कार्य करत होता. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्काच बसला असून गावाने एक सामाजिक कार्यकर्ता गमावला असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.









