;
जत , प्रतिनिधी
कोसारी (ता. जत) येथे विद्युतपंप चालू करायला गेलेल्या तरुणाचा विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रामचंद्र आनंदा वाघमोडे (वय.२१) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोहता येत असूनही डोक्यावर पडल्याने विहिरीत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची जत पोलिसात नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाघमोडे यांच्या घरापासून अर्धा किलोमीटरवर असणाऱ्या शेतात विहीर आहे. सकाळी दहा वाजता रामचंद्र हा मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर गेला होता. परंतु दोन तास घराकडे परतला नाही .म्हणून रामचंद्रचे वडील आनंदा वाघमोडे हे विहिरीवर गेले असता विहिरीच्या काठावर चप्पल पडलेली दिसून आली. शोधाशोध करून विहिरीतून मृतदेह काढण्यात आला. रामचंद्र यास पोहता येत होते. परंतु तोल गेल्याने तो डोक्यावर पडल्याने मानेला मार लागल्याने लागल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जत येथील ग्रामीण रुग्णालयात रामचंद्र याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आणले होते. रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती. आनंदा वाघमोडे यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. एकुलत्या एक मुलाचे निधन झाल्याने कोसारी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.