अध्याय पाचवा
बाप्पा सर्व समाजाला वडीलधाऱ्याच्या भूमिकेतून सांगत आहेत की, कर्मयोगावर निष्ठा ठेवा. ह्यासाठी शम आणि दम हे दोन्ही यासाठी आवश्यक आहेत. शम म्हणजे सहनशीलता. लोक काय बोलत आहेत ह्याकडे दुर्लक्ष करून कर्मयोगाचं आचरण चालू ठेवणे. तसेच चुकून कधी करत असलेल्या कर्मातून काही फळाची अपेक्षा निर्माण झाली तर ती झटकून टाकणे. या दोन्ही गोष्टी करणे म्हणजे शम होय आणि यासाठी आहे त्यात समाधानी राहणे म्हणजे दम होय. निरपेक्षतेनं कर्म करण्यासाठी शम आणि दम हे दोन्हीही आवश्यक आहेत. मनात उत्पन्न झालेल्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे माणसाच्या हातात असलं तरी त्या पूर्ण होणं न होणं हे दैवाच्या हातात असतं. त्यामुळे असा प्रयत्न करताना जो त्रासून जात नाही तो कायम समाधीत असतो आणि ही समाधी साधण्यासाठी शम आणि दम कायम आवश्यक आहेत. ह्या शम आणि दमाच्या सहाय्याने मनुष्य उत्तम योगाची प्राप्ती करून घेऊ शकतो. शम आणि दमाचा उल्लेख असलेला माउलींचा समाधी साधन संजीवन नाम …शांति दया सम सर्वांभूती हा अभंग सर्वश्रुत आहे. ते म्हणतात, समाधी साधन संजीवन नाम… शांति दया सम सर्वांभूती ।।1।। शांतिची पै शांती निवृत्ती दातारू ।हरिनाम उच्चारु दिधला तेणे ।।2।। शम दम कळा विज्ञान सज्ञान । परतोनी अज्ञान न ये घरां ।।3।। ज्ञानदेवा सिध्दी साधन अवीट ।भक्तीमार्ग नी हरिपंथी ।।4।। माऊली म्हणतात, कायम समाधीत राहण्यासाठी शांती, दया आणि समवृत्ती आवश्यक असून त्यासाठी हरिनाम आणि शम व दम आवश्यक आहेत हे साध्य केलं की पुन्हा मनामध्ये अज्ञानामुळे उत्पन्न होणारी कोणतीही शंका रहात नाही. अर्थातच अशी समाधी साध्य होणं हे अवीट गोडीचं साधन आहे. सुख, दुख, प्रेम, द्वेष, इच्छा हे विकार सर्वांनाच असतात. त्यावर मात करण्यासाठी शांती, दया आणि क्षमा हे गुण संतांनी त्यांच्या स्वभावात प्रयत्नपूर्वक वाढवलेले असतात आणि त्यामुळेच ते कायम समाधीत राहू शकतात.
शम म्हणजे सहनशीलता आणि दम म्हणजे आहे त्यात समाधानी राहणे हे आपण समजावून घेतले. शम आणि दमाला अंकित करून घेतलेल्या साधकाला अत्युत्तम प्रतीच्या सुखाची अनुभूती येत असते हे जरी समजले तरी आत्तापर्यंतच्या अनेक जन्मात अनुभवलेल्या इंद्रिय सुखाच्या गारुडाने माणसाच्या मनाचा कब्जा घेतलेला असतो. त्यामुळे त्याचे मन समाधीसुखाचे महात्म्य सहजी मान्य करायला तयार नसते. परिणामी त्याला इंद्रिय सुखाची आत्यंतिक ओढ वाटत असते. अर्थात माणसाच्या मनात एकदम बदल होणार नाही पण हळूहळू का होईना हे त्याच्या लक्षात येईल की समाधीसुखापुढे इंद्रियसुख हे अगदीच मामुली आहे. क्षणभर मिळणाऱ्या इंद्रिय सुखापेक्षा कायम टिकणारे समाधीसुख कितीतरी उच्च दर्जाचे आहे. अर्थात हे लक्षात येईपर्यंत आणि त्यासाठी मन तयार होईपर्यंत माणसाला सावध करण्यासाठी त्याला जेव्हा जेव्हा इंद्रियसुखाची आवड निर्माण होईल तेव्हा तेव्हा त्याने सावध रहावे म्हणून बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत की, इंद्रियांच्या सुखप्राप्तीचा संकल्प करणारा मनुष्य स्वत:चा शत्रू ठरतो.
इन्द्रियार्थांश्च संकल्प्य कुर्वन्स्वस्य रिपुर्भवेत् ।
एताननिच्छन्यऽ कुर्वन्सिद्धिं योगी स सिद्ध्यति ।। 3 ।।
अर्थ- इंद्रियांच्या अर्थांचा संकल्प करून कर्म करणारा स्वत:चा शत्रु होतो. पण त्यांची इच्छा न करता जो कर्म करतो तो योगी सिद्धि पावतो. विवरण- कर्मयोगाचं आचरण करताना येणाऱ्या एकेक अडचणी बाप्पा सविस्तर वर्णन करून सांगत आहेत. त्यापैकी पहिली अडचण म्हणजे इंद्रियसुख मिळावं म्हणून मनुष्य अनेक प्रयत्न करत असतो, त्यासाठी काही धार्मिक संकल्प करत असतो. नवससायास करत असतो काय वाट्टेल ते करून आपल्याला मिळावं अशी त्यांची इच्छा असते.








