गगनबावडा प्रतिनिधी
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या अनास्थमुळे वर्ष सरलं तरी गगनबावडा तालुक्यातील कुपलेवाडी ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. गतवर्षीच्या भूस्खलनाची पुनरावृत्ती होईल, या भितीने यंदा पावसाळा सुरू होताच काही कुटुंबानी राहती घरे सोडली आहेत. दहशतीखाली असलेल्या 90 कुटुंबांना शासनाकडून कधी दिलासा मिळणार, अशी विचारणा ग्रामस्थातून होत आहे.
गतवर्षी 22 जुलै रोजी जिह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते, मोठय़ा प्रमाणावर भूस्खलन झाले. ही मध्यरात्र राधानगरी तालुक्यातील कोनोली पैकी कुपलेवाडीसाठी काळरात्र ठरली. येथील बोंडग्याची डाग येथे रात्री बाराच्या सुमारास भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱयाखाली चार घरे गाडली गेली. वसंत कुपले, त्यांची पत्नी, सासू यात मृत्यूमुखी पडले. चार दुभत्या म्हशी दगावल्या. या घटनेला एक वर्ष पूर्ण झालेय. एक वर्ष सरलं, मात्र या दुर्दैवी घटनेची जनतेच्या मनात आजही भीती आहे.
कुपलेवाडीत भूस्खलनानंतर जिह्यातील अधिकारी, पदाधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. नव्याचे नऊ दिवस प्रमाणे या घटनेची चर्चा झाली होती. मात्र कालांतराने सर्वानांच यांचा विसर पडला. आईवडिलांविना पोरका झालेल्या मुलगा, अन्य बाधित कुटुंबांना शासकीय मदत मिळाली. पण याचे दूरगामी परिणाम येथील जनतेच्या मनावर झाले आहेत. अशातच गावच्या दक्षिणेला डोंगरास एक फूट रुंद व चारशे फूट लांब भेग पडली आहे.
अतिपाऊस झाला तर पुन्हा भूस्खलनाची दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात भीतीने निम्म्याहून अधिक कुटुंबांनी घरे सोडली आहेत. प्रशासनाने या बाधित गावाकडे पाठ फिरवली आहे. गतवर्षी भूस्खलन झालेला भराव सरकला तर आणखी काही घरांचे नुकसान होणार आहे. हा भराव काढणे किंवा या घरांमागे संरक्षक भिंतीसाठी कार्यवाही होणे गरजेचे होते. गावचे पुनर्वसन करण्याबाबत महसूल विभागाकडून सुरुवातीस प्रयत्न झाले. मात्र वस्ती देवस्थान जमिनीत की सरकारी जमिनीत या वादात पुनर्वसनाचा हा विषय रेंगाळला. त्यामुळे याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
भूस्खलनात शेती मोठय़ा प्रमाणात वाहून गेली, ती नापिक बनली आहे. शेतजमीन दुरुस्ती, सपाटीकरणासाठी भरीव मदत गरजेची होती, येथील 90 कुटुंबातील पाचशे लोकांना आधार देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. यंदाही संभाव्य धोका, मुंलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बहुतांशी ग्रामस्थांनी मुले प्राथमिक शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवली आहेत.
20 विहिरींची स्वखर्चाने खुदाई
भूस्खलन काळात येथील शेतकऱयांच्या विहिरी गाडल्या गेल्या. मोटर पंप, विजेचे खांबांचे मोठे नुकसान झाले होते. उन्हाळ्यात येथील 20 शेतकऱयांनी स्वखर्चाने विहिरी खुदाई केल्या. अशा शेतकऱयांना अनुदान मिळणे गरजेचे होते.









