ए. वाय. पाटील यांची सोळांकूर येथील मेळाव्यात घोषणा
प्रतिनिधी/सरवडे
२७ वर्षांच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर आणि विश्वासावर मी घडलो. नेतृत्वाने वार्यावर सोडले असले तरी कार्यकर्त्यांच्या हृदयात माझे स्थान अढळ आहे. म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता चार दिवसांत योग्य तो निर्णय घेईन तसेच कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आमदार झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांनी केली.
सोळांकूर ( ता. राधानगरी ) येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील विविध गावांतील ए. वाय. समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या मेळाव्यात ते काय निर्णय घेणार याची संपूर्ण जिल्हाभर चर्चा होती. मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याची घोषणा केल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.
यावेळी पाटील पुढे म्हणाले, माझ्या राजकारणात सातत्याने कार्यकर्त्याला मोठे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या ताकदीवर मी मोठा झालो असून त्यांना कधीही अंतर देणार नाही. मी आमदार व्हावे ही तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यासाठी आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष (NCP District President) म्हणून जिल्हाभर कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली. पक्षाच्या वाढीसाठी अतोनात प्रयत्न करुनही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडगाव येथील कार्यक्रमात विधानसभेच्या उमेदवारीची परस्परच घोषणा केल्याने आपल्याला दुःख झाले आहे. आमच्या मेव्हण्या- पाहूण्यांच्या वादासमोर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनीच हात ठेकल्याचे वक्तव्य केल्याने मी निराश झालो असून आता योग्य निर्णय घेण्याचा आपल्यावर कार्यकर्त्यांचा दबाब आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता योग्य तो निर्णय घेईन.
यावेळी रणजीत पाटील, भिमराव कांबळे, अशोक साळुंखे (नागणवाडी ), दिपक पाटील, दिगंबर चव्हाण, बाबुराव साबळे, मारुती बारड, बाळू कामते, विलास हळदे, संग्राम कदम, भिकाजीराव एकल, भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक नेताजी पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास फिरोजखान पाटील, एकनाथ पाटील, महादेव कोथळकर, नाना पाटील, सचिन पाटील, वाय. डी. पाटील, संजीवनी कदम , सर्जेराव पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक गोकूळचे संचालक प्रा. किसन चौगले यांनी केले. बिद्रीचे संचालक युवराज वारके यांनी आभार मानले.
‘त्यांना’ मी हनुमानासारखी साथ दिली
१९९५ पासून मी त्यांच्या प्रत्येक निवडणूकीत सारथ्याची भूमिका पार पाडली. प्रत्येकवेळी मला ते यावेळी मी निवडणूक लढवतो, पुढील वेळी तुम्हाला संधी देतो असा शब्द द्यायचे. परंतु प्रत्येकवेळी माझी फसवणूक झाली. अंगावरील हळद निघण्यापूर्वीच मला पद्धतशीर बाजूला केले गेले. रामभक्त हनुमानाप्रमाणे साथ सोबत करुनही आपल्यावर दरवेळी अन्यायच झाल्याचा उच्चार त्यांनी यावेळी माजी आ. के. पी. पाटील यांचे नाव न घेता केला.
मुश्रीफांनी हात टेकले
माझ्या राजकीय जीवनात आ. हसन मुश्रीफ यांनी मला आधार दिला. तेच माझे माय-बाप आहेत. आमच्या मेव्हण्या- पाहूण्यांच्यात समेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु या वादासमोर हसन मुश्रीफ यांनीच हात टेकल्याने मग मी कोणाकडे बघु, अशी अगतिकताही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.









