केएसआरटीसीचे स्पष्टीकरण : विद्यार्थिनींसह महिलांना होणार अनुकूल
प्रतिनिधी/ बेंगळूर
पाच गॅरंटी योजनापैकी एक असलेल्या शक्ती योजनेचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना झेरॉक्स प्रत किंवा मोबाईल मधील डिजी लॉकर मध्ये असणारी कोणतेही ओळखपत्र दाखवून मोफत प्रवास करता येणार आहे, असे स्पष्टीकरण केएसआरटीसीने दिले आहे. सोमवारी या संबंधीचे पत्रक जारी करण्यात आले. राज्यात रविवारी काँग्रेस सरकारने महिलांच्या मोफत बस प्रवासासाठी शक्ती योजना जारी केली. मात्र कंडक्टरकडून महिलांना आधार किंवा मतदार ओळख पत्राची ओरिजीनल प्रत दाखविली तरच मोफत
प्रवास करता येईल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे काही महिलांनकडून तिकिटाचे पैसे वसुल करण्यात आले. तर काही महिलांना बसमधून खाली उतरविण्यात आले. रविवारी प्रवासादरम्यान एका महिलेला ओळख पत्राची ओरिजीनल प्रत दाखविली तरच बसमधून मोफत प्रवास करता येईल, असे सांगितले होते. या संबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान सोमवारी केएसआरटीसीने या गोंधळावर पडदा टाकला आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या मोबाईलवरील डिजी लॉकरमध्ये असणारे ओळखपत्र किंवा मूळ दाखल्याची नक्कलप्रत दाखवून देखील महिलांना मोफत प्रवास करता येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थिनी आणि महिलांना अनुकूल होणार आहे. राज्य सरकारकडून पुढील तीन महिन्यात शक्ती स्मार्ट कार्ड वितरणाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर महिलांना स्मार्टकार्ड दाखवून प्रवास करता येईल. तोपर्यंत महिलांना केएसआरटीसी, बीएमटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी आणि केकेआरटीसीच्या बसेसमधून प्रवास करता येणार आहे.
पहिल्या दिवशी 5.71 लाख महिलांचा प्रतिसाद
रविवारी दुपारी 1 वाजता शक्ती योजनेला अधिकृतपणे चालणा देण्यात आली. त्यानंतर अर्ध्या दिवसातच राज्यभरातील चारही परिवहन निगमच्या बसेसमधून
5,17,023 महिलांनी मोफत प्रवास केला आहे. या महिलांना शून्य तिकिट देण्यात आले. मात्र या प्रवासाचे तिकिटमूल्य 1 कोटी 40 लाख 22 हजार 878 रूपये इतके होते. ही रक्कम परिवहन निगमला राज्य सरकारकडून अदा केली जाणार आहे.
निगम प्रवाशांची संख्या तिकिटाचे मूल्य
केएसआरटीसी 1,93,831 58,16,178
बीएमटीसी 2,01,215 26,19,604
एनडब्ल्यू केआरटीसी 1,22,354 36,17,096
केकेआरटीसी 53,623 19,70,000
सरकारने विद्यार्थिनी आणि महिलांसाठी मोफत बसप्रवासासाठी शक्ती योजना जारी केली आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी महिलांची गर्दी उसळत आहे. परिणामी महिलांना बससेच्या प्रवेशद्वारावर लोंबकळत जावे लागत आहे. सोमवारी वायव्य परिवहन मंडळाच्या बसमधून शाळेला जाणाऱ्या 14 वर्षीय मधु कुंभार नामक विद्यार्थिनी बसमधून खाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना हावेरी जिल्ह्यात घडली आहे. वासन येथून कसनूरू येथील सरकारी शाळेत जात असताना विद्यार्थिनीला प्राण गमवावा लागला आहे. बस पूर्णपणे भरल्याने मधूला बसच्या प्रवेशद्वारावर थांबवून प्रवास करावा लागला होता. आडूर पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.









