शाळा तसेच टय़ुशन नाही, केवळ 90 मिनिटांचे शिक्षण
40 वर्षीय माइक पोप आणि त्यांची पत्नी ब्रुक मागील 3 वर्षांपासून वर्ल्ड टूरवर आहेत. त्यांनी आतापर्यंत 15 देशांमध्ये प्रवास केला असून त्यांच्या या यादीत आणखीन अनेक देश सामील आहेत. सर्वात चकित करणारी बाब म्हणजे त्यांच्या या वर्ल्ड टूरमध्ये त्यांची 3 मुले देखील सामील आहेत, त्यांचे वय शाळेत जाऊन शिकण्याचे असताना ती जगभर प्रवास करत आहेत.
माइक आणि ब्रुक यांच्या मुलांचे वय 3, 8 आणि 6 वर्षे आहे. मॅक्स, माइला आणि डेजी नावाच्या तिन्ही मुली विविध देशांमध्ये जाऊन आल्या आहेत. मुलांचे वय मूलभूत शिक्षण घेण्याचे असल्याने आईवडिलांनी त्यांच्यासाठी एक वेळापत्रक तयार केले आहे. त्यांनी फेब्रुवारी 2020 पासून सुरू केलेली स्वतःची टूर आतापर्यंत सुरू आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहणारे माइक हे तेथे फायरफायटर म्हणून काम करायचे, तर त्यांची पत्नी ट्रव्हल एजंट होती. दोघांनी स्वतःची पूर्णवेळ नोकरी सोडून ट्रव्हलिंग लाइफस्टाइल स्वीकारली आहे. आता ते ऑनलाइन मार्केटिंगद्वारे स्वतःच्या जीवनाच्या गरजा भागवत आहेत.
आतापर्यंत भ्रमंती करणारे हे कुटुंब माल्टा, मेक्सिको, सर्बिया, बोस्टन, फ्लोरिडा, आइसलँड, तुर्कस्तान, युनायटेड किंगडम यासारख्या देशांची सैर करून आले आहे. पती-पत्नी दोघांनाही हिंडण्याची आवड असल्याने त्यांनी मुलांपूर्वी आणि मुले झाल्यावरही स्वतःची आवड जोपासली आहे.
हे दांपत्य घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या कनिष्ठ कन्येचा जन्म झाला होता. आता ती 3 वर्षांची झाली आहे. प्रवासादरम्यान मुलांना शाळेत जाता येत नव्हते. अशा स्थितीत त्यांचे आईवडिल या मुलांना दररोज दीड तासांसाठी शिकवितात आणि त्यांना हे पुरेसे असल्याचे वाटते. प्रत्येक दिवसासोबत मुली काही तरी नवीन शिकत असल्याचे त्यांचे मानणे आहे. या मुली नवीन माणसांना भेटतात, नवे मित्र जमवितात.









