1 फेब्रुवारीला रात्रीचा होणार ‘दिवस’ ः विशाल धूमकेतू पाहता येणार
वृत्तसंस्था/ पॅरिस
अंतराळप्रेमींसाठी 1 फेब्रुवारीची रात्र अत्यंत विशेष असणार आहे. त्या दिवशी रात्री अंतराळात घडणारी घटना अत्यंत रंजक असणार आहे. ही घटना 50 हजार वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडणार आहे. हे अद्भूत दृश्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायचे असल्यास थंडी असली तरीही खुल्या आकाशाखाली रात्र काढावी लागणार आहे. 1 फेब्रुवारीला विशाल धूमकेतू सूर्यानंतर पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणार आहे. हा धूमकेतू पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणार असल्याने तो डोळय़ांनी पाहता येणार आहे.
हा धूमकेतू 1 फेब्रुवारीला पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. या धूमकेतूला अधिक बारकाईने पाहण्याची इच्छा असल्यास टेलिस्कोपचा वापर करणे योग्य ठरणार आहे. हा धूमकेतू 50 हजार वर्षांमध्ये पहिल्यांदाच पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे.
1 फेब्रुवारी रोजी पूर्ण चंद्र निघाला तर हा धूमकेतू डोळय़ांनी दिसण्याची शक्यता कमी आहे. यासंबंधीची माहिती अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ज्विकी ट्रांझिएंट फॅसिलिटीने दिली आहे. हा धूमकेतू पहिल्यांदा मागील वर्षी मार्च महिन्यात गुरु ग्रहाजवळून जात असताना दिसून आला होता. या धूमकेतूचे नाव सी/2022 ई3 (झेडटीएफ) ठेवण्यात आले आहे. आमच्या सूर्यमालेच्या बाहेरील कक्षेतून प्रवास केल्यावर हा धूमकेतू 12 जानेवारीला सूर्याच्या सर्वात जवळून गेला होता आणि 1 फेब्रुवारीला पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे. यादरम्यान या धूमकेतूमधून उत्सर्जित होणारा प्रकाश रात्रीच्यावेळी दिवसाची अनुभूती देणारा ठरू शकतो.
हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात नजीक पोहोचल्यावर सर्वात प्रकाशमान असेल, असे कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक थॉमस प्रिन्स यांनी सांगितले आहे. धूमकेतू हा बर्फ, वायू आणि धूळ यांच्यापासून तयार झालेला असतो आणि त्यातून हिरव्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित होत असल्याचे खगोलशास्त्रज्ञ निकोलस बिवर यांनी सांगितले आहे.
या धूमकेतूचा व्यास एक किलोमीटर हा निओवाइज म्हणजेच उघडय़ा डोळय़ांनी पाहिलेल्या अखेरच्या धूमकेतूपेक्षा लहान असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 60 किलोमीटर व्यास असलेला हेल-बोप्प धूमकेतू 1997 मध्ये दिसला होता. त्यापेक्षा सी/2022 ई3 (झेडटीएफ) हा धूमकेतू लहान असला तरीही तो अधिक प्रकाशमान असल्याचे सांगण्यात येत आहे. या धूमकेतूतून उत्सर्जित होणारा प्रकाश रात्रीतही दिवसाचा अनुभव देणारा आहे. उत्तर गोलार्धात सकाळच्या वेळी हा आकाशात दिसणार आहे. हा धूमकेतू ओर्ट क्लाउड येथून येत असल्याचे मानले जात आहे. ओर्ट क्लाउड हे सूर्यमालेच्या चौफेर असलेले एक विशाल क्षेत्र आहे.









