मुलाचे रक्त शरीरात चढविले
अनेक लोकांना स्वत:चे वय स्वीकारता येत नाही. ते स्वत:च्या वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी अनेक उपाय करत असतात. परंतु माणसाच्या हाती वेळ नसल्याचे सर्वांना कळून चुकले आहे. कितीही संपत्ती प्राप्त केली तरीही वाढते वय रोखता येत नाही. परंतु काही लोक याकरता काहीही करण्यास तयार असतात. मार्सेला इग्लेसियास नावाच्या महिलेला स्वत:चे वाढते वय रोखायचे आहे. ती याकरता शक्य ते सर्वकाही करत आहे. मार्सेलाने स्वत:च्या तरुण मुलाचे रक्तही स्वत:च्या शरीरात चढवून घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. 47 वर्षीय मार्सेला इग्लेसियासला कधीच वृद्ध न दिसण्याचा ध्यास आहे. याकरता तिने आतापर्यंत 91 लाखापेक्षा अधिक रुपये कॉस्मेटिक प्रोसिजरवर खर्च केले आहेत. याचबरोबर ती दर महिन्याला 83,111 रुपये आयव्ही, वेलनेस इंजेक्शन, व्हिटॅमिन आणि क्रीम्सवर खर्च करते. हा सर्व प्रकारच्या तिच्या एंटी एजिंग कॅम्पेनचा हिस्सा आहे. या कॅम्पेन अंतर्गत तिने स्वत:च्या 23 वर्षीय पुत्र रोड्रिगोचे रक्तही स्वत:च्या शरीरात चढविले आहे. मार्सेला स्वत:ला ह्यूमन बार्बी म्हणवून घेते, ब्लड ट्रान्सफ्यूजनद्वारे माझ्या यंग सेल्स कायम राहतात, खासकरून हे रक्त जर स्वत:च्या मुलाकडून किंवा मुलीकडून मिळाले असेल तर शक्य होते, असे तिचे सांगणे आहे.









