उंब्रज :
आंबळे (ता. पाटण) गावच्या हद्दीत तुकाई नावच्या शिवारामध्ये संभाजी महाडिक यांच्या शेताजवळ तारळी नदीच्या पाण्यात 43 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना 25 रोजी दुपारी घडली. साधना रमेश सावंत (वय 43, रा. आंबळे, ता. पाटण) असे तारळी नदीच्या पाण्यात बुडून मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मृत महिलेचा पुतण्या अक्षय गोरख घाडगे (वय 29, रा. आंबळे, ता. पाटण) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांच्या चुलती साधना या नेहमी तारळी नदीवरील मोठ्या पुलावर कपडे धुण्यासाठी नियमित जात असत. बुधवारी 25 रोजी दुपारी अक्षय घाडगे हे तारळे येथे असताना त्यांना सरपंच रोहित खरात यांनी फोन करून साधना सावंत या नदीच्या पाण्यातून वाहून गेल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी आंबळे येथे नदीकाठी शोध घेतला असता साधना या आंबळे गावच्या हद्दीत तुकाई नावाच्या शिवारामध्ये संभाजी महाडिक यांच्या शेताजवळ नदीच्या पाण्यात कडेला पाईपला अडकल्याचे दिसल्याचे आढळून आले. गावातील अमोल घाडगे व अक्षय पाटणकर यांनी मृतदेह पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढला. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे. मृत साधना यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, पती, सासू व सासरे असा परिवार आहे.








