पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या कात्रज-मांगडेवाडी परिसरातील ‘कल्पनानंद’ या दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या 32 वर्षीय महिलेवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी डॉक्टरला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. अमित आनंदराव दबडे (वय 29, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 1 जुलै 2022 पासून आत्तापर्यंत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. अमित दबडे याचा कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथे ‘कल्पनानंद’ नावाचा दवाखाना आहे. या दवाखान्यात संबंधित महिला एकदा आजारी असताना तपासणीसाठी आली होती. त्यावेळी डॉक्टरची तिच्याशी ओळख झाली. तेव्हा डॉक्टरने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तो महिलेला फोन आणि मेसेज करत राहिला. महिला पुन्हा एकदा आजारी असताना दवाखान्यात आल्यानंतर तिला इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने डॉक्टरने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही तो महिलेचा वारंवार पाठलाग करत राहिला. डॉक्टरच्या त्रासाला कंटाळून या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस तावडे याबाबत पुढील तपास करत आहे.









