तिघे गंभीर जखमी : सर्वजण एकाच कुटुंबातील
प्रतिनिधी /फोंडा
वजनगाळ-शिरोडा येथे कारगाडीची झाडाला धडक लागून झालेल्या अपघातात एका महिलाचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. उमा उमेश गुरव (66) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून किशन गुरव (57), शोभावती किशन गुरव (50) हे पती पत्नी व त्यांचा मुलगा श्याम गुरव (27) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण विझार पंचवाडी येथील आहेत. चालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला व हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी रात्री उशिरा 12 वा. सुमारास वजनगाळ शिरोडा येथील वळणावर हा अपघात झाला. गुरव कुटुंबातील हे सर्वजण पणजी येथे एका वाढदिवसाला गेले होते. जीए 05 एफ 5587 या क्रमांकाच्या टाटा पंच कारमधून उशिरा रात्री विझार पंचवाडी येथे घरी परतत असताना वाटेत त्यांच्या वाहनाला अपघात झाला. किशन हा कारगाडी चालवत होता. घरापासून साधारण सहा किलो मिटर अंतरावर वजनगाळ येथे पोचले असता कारगाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जोरात धडकली व नंतर बाजूच्या शेतात जाऊन कोसळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, कारगाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला व पाठिमागील सिटवर बसलेल्या उमा गुरव यांचे डोके जोरात आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
मयत उमा ही किशन यांची चुलती असून तिला पती व अन्य कुणी नसल्याने ती आपल्या पुतण्याकडेच राहत होती.









