बसवेश्वर सर्कलमध्ये अपघात : पती जखमी : पोलिसांनी टिप्पर घेतला ताब्यात
बेळगाव : भरधाव टिप्परने दुचाकीला ठोकरल्याने मुस्लीम गल्ली, अनगोळ येथील महिला जागीच ठार झाली तर पती जखमी झाला. सोमवारी रात्री बसवेश्वर सर्कल, गोवावेसजवळ ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, सदाशिव देशन्नावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळी गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी हटवून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला हलविला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताहिरा मेहमूद मत्तेकर (वय 50) रा. मुस्लीम गल्ली, अनगोळ असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव असून पती मेहमूद जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतला आहे. ताहिरा व पती मेहमूद हे दोघे दुचाकीवरून अनगोळकडे जात होते. त्यावेळी गोवावेस सर्कलजवळ टिप्परची धडक बसून हे दांपत्य खाली पडले. टिप्पर अंगावरून गेल्याने ताहिरा जागीच ठार झाल्या. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.









