बोकडांना पाणी पाजायला गेले असता मगरीने साधला डाव, घटनेमुळे डिचोलीत खळबळ
महिला सावरधाट लाटंबार्से येथील, मृतदेहाचा शोध घेण्यास डिचोली अग्निशामक दलाला यश
धरणाच्या काठावर संरक्षण कुंपण उभारण्याची पंचसदस्य दिलीप वरक यांची मागणी
डिचोली. प्रतिनिधी
डिचोली तालुक्यातील आमठाणे या धरणाच्या पात्रात बोकडांना पाणी पाजायला गेली असता एका महिलेला धरणातील मगरीने खेचून पाण्यात ओढल्याने तिचा मृत्यू होण्याची दुदैवी घटना घडली. या घटनेमुळे डिचोली मतदारसंघात एकच खळबळ माजली. गेल्याच दोन महिन्यांपूर्वी या महिलेच्या पतीचा बोकडांना चरायला नेले असता हृयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तर आता या महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याने सावरधाट भागात शोककळा पसरली आहे.
उपलब्ध माहितीनुसार काल शनि. दि. 20 मे रोजी दुपारी घडली. सावरधाट लाटंबार्से येथील संगीता बाबलो व शिंगाडी (47) ही महिला बोकडांना चरविण्यासाठी गेली होती. दुपारी दीड वा. च्या सुमारास सर्व बोकडांना आमठाणे धरणाच्या एका टोकाला वडावलच्या बाजूने पाणी पाजण्यासाठी गेली होती. धरणाच्या काठावर बोकडांनी पाणी पिल्यानंतर संगीता पाण्यात उतरून बोकडांना वरच्या भगात हाकलत असतानाच पाण्याखालून आलेल्या मगरीने तिच्या पायाला पकडून तिला पाण्यात खेचले.
पाण्यात खेचताच संगीता यांच्यासमोर स्वत:ला वाचविण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे त्या पाण्यात ओढल्या गेल्या व गतप्राण झाल्या. ही घटना याच भागात बोकडांना चरायला गेलेल्या अन्य एका व्यक्तीने पाहिली होती. त्याने ती इतरांना सांगताच त्याचा उलगडा झाला. लागलीच या घटनेची माहिती डिचोली पोलीस व अग्निशामक दलाला देण्यात आली.
अग्निशामक दलाचे जवान दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाले. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्यात होडी सोडून मृतदेहाचा शोध सुरू केला. अखेर त्यांना पाण्यात मृतदेह आढळला, तो काठावर आणण्यात आला. मगरीने महिलेच्या शरीराचे चावे घेतले होते. डिचोली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अग्निशामक दलाच्या राजन परब, अमोल नाईक, महेश देसाई, विशांत वायंगणकर, रूपेश गावस, गितेश नाईक या जवानांनी अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह शोधकार्यात सहभाग घेतला.
जलस्रोत खात्याला संरक्षण कुंपण उभारण्याची केली होती सूचना :
आमठाणे धरणात घडलेली घटना ही दु:खद व दुर्दैवी आहे. गेल्या 1978 साली आमठाणे धरणाची जागा आखण्यात आली होती. त्यानंतर धरणाच्या या जागेची आखणीच करण्यात आलेली नाही. आपण आमदार झाल्यानंतर जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांना घेऊन या धरणाच्या जागेची पाहणी केली होती व धरणाच्या सभोवताली संरक्षण कुंपण घालण्याची मागणी केली होती. त्यादृष्टीने सर्व प्रक्रिया तयार करण्याचीही सूचना केली होती. परंतु त्याकडे अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. जर सदर संरक्षण कुंपण घातले असते तर अशा प्रकारचे प्रकार घडले नसते. आता या घटनेचे बोध घेत जलस्रोत खात्याने या धरणाची जागा आखून घ्यावी, त्यामुळे जलस्रोत खात्याच्या जाग्यात मानवी अतिक्रमण होणार नाही. तसेच धरणाची जागा खात्याला कळणार. या धरणाच्या सभोवताली संरक्षण कुपण घातल्यास अशा घटना घडणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी व्यक्त केली.
धरणाच्या परिसरात संरक्षण कुंपण त्वरित घालावे – पंचसदस्य दिलीप वरक (फोटो. 0520ंग्म्5) आमठाणे धरणात मोठ्या संख्येने मगरी आहेत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत व लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या धरणाच्या सर्व काठांवर ज्याठिकाणी लोकांचा थेट संपर्क येतो. तेथे संरक्षण कुंपण घालण्यात यावे. पाण्याची जागा असल्याने अनेकजण पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही आणि नंतर जीव गमावून बसतात. त्यासाठी या संपूर्ण धरणाच्या काठांचे संरक्षण कुंपण घालून लोकांचे जीवन सुरक्षित करावे, अशी मागणी सावरधाट भागाचे पंचसदस्य दिलीप वरक यांनी केली आहे.









