राशिवडे ते चांदे मार्गावरील दुर्घटना
भोगावती/प्रतिनिधी
चांदे ता राधानगरी येथील पुतणीच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी जाताना घाटातील वळणावर मोटारसायकलवरुन तोल जाऊन खाली रस्त्यावर पडल्याने श्रीमती कल्पना नारायण कुरणे (वय ४२ रा कसबा बावडा कोल्हापूर ) ही महिला ठार झाली. राशिवडे ते चांदे मार्गावरील घाटात बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
चांदे येथील पुतणी अस्मिता यल्लाप्पा कांबळे यांच्या नवीन बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी त्या कसबा बावडा येथून आल्या होत्या.राशिवडे मार्गावरून चांदे गावाकडे जाताना एका वळणावर मोटारसायकलवरुन तोल जाऊन खाली पडल्या.त्या डांबरी रस्त्यावर डोक्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली.अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाँक्टरनी सांगितले.
त्यांचे माहेर केळोशी बु।असून विद्यमान सरपंच भारती राऊ कांबळे यांची ती भाची आहे.उत्तरीय तपासणी नंतर मृतदेहावर तिच्या माहेरी केळोशी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.कसबा बावडा येथे धुणी भांड्याचे काम करून ती आपला उदरनिर्वाह चालवित होती.तिच्या पश्चात आई वडील,भाऊ व एक मुलगा आहे.









