महिलेवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
देवरुख / प्रतिनिधी
देवरूख बसस्थानक येथे एसटीमध्ये चढणाऱया विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवताना रत्नागिरी शिवाजीनगर येथील वृध्द महिलेला रंगेहाथ पकडण्यात आल्याचा खळबळजनक पकार बुधवारी घडला. या महिलेवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या महितीनुसार, या बाबत निकीता उमेश सनगरे हीने फिर्याद दिली आहे. अनघा अनंत जोशी (61, रा. शिवाजीनगर रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. निकीता सनगरे ही विद्यार्थिनी बुधवारी सकाळी टायपिंगचा क्लास आटोपून सकाळी 11.15 वाजता सुटणाऱ्या देवरूख काटवलीमार्गे संगमेश्वर बसमधून सोनवडे येथे जात होती. बसमध्ये पवेश करताना निकीताच्या गळ्यातील सोन्याची चेन अनघा जोशी यांनी हिसकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही चेन 7 ग्रम 580 मिली वजनाची व 15 हजार रूपये किंमतीची आहे. चेन खेचल्यानंतर ही महिला पलायन करत होती. मात्र निकीताने समयसुचकता दाखवत अनघा जोशी यांनी धरून ठेवले. हा पकार प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी निकीताला सहकार्य केले. यानंतर ही बस थेट देवरूख बसस्थानकातून देवरूख पोलीस ठाण्यात आणण्यात आली. निकीताने दिलेल्या फिर्यादीवरून अनघा जोशी यांच्यावर भारतीय दंड विधान कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस कान्स्टेबल व्ही. व्ही. कदम करत आहेत.
29 जुलै 2022 रोजी याच बसफेरीमधून काटवली येथील विद्यार्थिनी तृप्ती अशोक उबारे या विद्यार्थिनीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत लंपास केली होती. या बाबतही देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. तृप्ती हीने अनघा जोशी यांना पाहताच त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. यामुळे तपासाअंती अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. या महिलेसमवेत अन्य साथीदार असल्याचा संशय पवासीवर्गाने व्यक्त केला आहे.









