प्रतिनिधी/ बेळगाव
शेताला गेलेल्या जुने बेळगाव येथील शेतकरी महिलेचा विजेच्या धक्क्मयाने मृत्यू झाला. शगनमट्टी ता. बेळगाव येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली असून रात्री हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
चांगुणा कृष्णा मंडोळकर (वय 56) रा. लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सोमवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. रक्षाविसर्जन होणार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चांगुणा व पती कृष्णा हे दोघे शगनमट्टी येथील शेतावर भातपिकाच्या पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी शेतात तुटून पडलेल्या वीजभारीत तारेचा चांगुणा यांच्या पायाला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसून त्या अत्यवस्थ झाल्या. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. दुपारी 12.45 वाजता उपचारांचा उपयोग न होता चांगुणा यांचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.









