वार्ताहर/ गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी दुपारी 1 च्या बुडताना कोल्हापूर येथील महिलेला वाचवण्यात स्थानिक पोलीस, जीवरक्षक व मोरया वॉटरस्पोर्टच्या सदस्यांना यश आले.
प्रियंका बालाजी सपाटे (30, रा. मंगळवार पेठ, तालुका-जिल्हा कोल्हापूर) असे बुडताना वाचवलेल्या महिलेचे नाव आहे. प्रियंका सपाटे या रविवारी गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आपल्या कुटुंबीयांसमवेत आल्या होत्या. यावेळी सर्व सपाटे यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी आल्यानंतर प्रथम आंघोळीसाठी ते समुद्रात उतरले. यावेळी प्रियंका सपाटे या खोल समुद्रात गेल्या असत्या यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात बुडू लागल्या. यावेळी येथे कर्तव्यावर असलेले गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक प्रशांत लोहलकर, पोलीस शिपाई सागर गिरीगोसावी व गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक आणि मोरया वॉटर स्पोर्टच्या सदस्यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ गणपतीपुळे समुद्राकडे धाव घेत संबंधित महिलेला खोल समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर या महिलेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या ऍम्बुलन्सने अधिक उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी या महिलेवर उपचार केले. सध्या प्रियंका सपाटे यांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. बुडणाऱया महिलेला वाचवण्यात विशेष योगदान देणाऱया पोलीस, जीवरक्षक व मोरया वॉटर स्पोर्टच्या सर्व सदस्यांचे गणपतीपुळे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.









