पुलाची शिरोली / वार्ताहर
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील सुतार पाणंद जवळ शेत मजूर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील चंदू किसन कोरवी आणि त्यांची पत्नी कविता चंदू कोरवी हे कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी दोन वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत आहे. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा हा निमशिरगाव येथे आजीकडे राहतो. तर लहान मुलगा हा आई-वडिलांच्याकडे मौजे वडगाव येथे राहतो. नेहमीप्रमाणे हे कुटुंब शेतमजुरीसाठी गेले होते. बुधवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मौजे वडगाव येथील सुतारपाणंद रोडवर बार भाई शेती परिसरात कविता चंदू कोरवी या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शेतकऱ्यांना आढळून आला. मृतदेह शेजारी सायकल पडलेली होती. आणि मृत महिलेचा पती चंदू कोरवी हा बेपत्ता होता. या महिलेचा निर्घूनपणे खून केल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मौजे वडगावचे ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. हा खून नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.