पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेक जण आपली वाहने घराबाहेर उघड्यावरच पार्क करतात ही आता मोठ्या शहरांमध्ये नित्याचीच बाब झाली आहे. अनेकजण स्कूटीसारखी छोटी वाहनेही घरात घेऊन येण्यापेक्षा बाहेरच मार्गांच्या बाजूला पार्क करताना दिसून येतात. पण पावसात स्कूटी अशी उघड्यावर पार्क करणे हे धोकादायक ठरु शकते, असा इशारा तज्ञांनी नागरीकांना दिला आहे.
सध्या उत्तर भारतात पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने सापांच्या वारुळांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी साप स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वारुळांमधून बाहेर पडले असून आडोशाची आणि सुरक्षित जागेच्या शोधात आहेत. कोठल्याही फटीत, कोपऱ्यात, कोणालाही सहज न दिसेल जागी त्यांनी आसरा शोधावयास प्रारंभ केल्याने मानवाचा धोका वाढला आहे. आपण आपले वाहन किंवा स्कूटी घराबाहेर पावसात उभी केली असेल तर तिच्याही मधल्या भागाच्या पोकळीत साप बसला असण्याची शक्यता असते. आपण नीट तपासणी न करता वाहन सुरु करण्याचा प्रयत्न केल्यास हे साप आपल्याला डसण्याचा संभव आहे.
अशा काही घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे घराबाहेर वाहने पार्क करणाऱ्यांनी या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्धर प्रसंग उद्भवू शकतो. नंतर धावपळ करण्यापेक्षा आधीच सावधानता बाळगणे आणि संभाव्य धोका ओळखणे आवश्यक आहे. म्हणून पावसात भिजलेले वाहन हाताळण्याआधी बारकाईने ते तपासणे आवश्यक आहे.









