गदग जिल्ह्यातील गजेंद्रगडच्या महिलेचे सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे
बेळगाव : राज्य सरकारने मागील वर्षी सत्तेवर आल्यापासून सुरू केलेल्या पंचहमी योजनेची अंमलबजावणी चोखपणे सुरू असल्याचे सरकार दावा करीत आहे. याला पुष्टी देत काही लाभार्थी सरकारकडून मिळालेल्या आर्थिक सोयीतून स्वत:साठी खर्च न करता समाजासाठी कार्य करीत असल्याची काही उदाहरणे डोळ्यासमोर येत आहेत. गजेंद्रगड, जि. गदग येथील एका महिलेने गृहलक्ष्मी योजनेतून आतापर्यंत मिळालेली रक्कम एकत्र करून त्यातून कूपनलिका खोदली आहे. गजेंद्रगड येथील मालदार कुटुंबातील सासू-सुनेला गृहलक्ष्मी योजनेतून प्रतिमाह 2 हजार रुपये मिळत आहेत. दोघींनी गृहलक्ष्मी योजनेची गेल्या काही महिन्यातील रक्कम एकत्र करून आपल्या बँक खात्यावरील काही रक्कम मिळवून कूपनलिका खोदण्याची तयारी केली.
मालदार कुटुंबीयांची गजेंद्रगडमध्ये 3 एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये 44 हजार रुपये खर्च करून कूपनलिकेसाठी लागणारे साहित्य आणले आहे. मजुरी, साहित्याची वाहतूक असा एकूण खोदण्यासाठी 60 हजार रुपये खर्च आला आहे. गेल्या 10 डिसेंबर रोजी मालदारांच्या शेतवडीत कूपनलिका खोदण्याला सुरुवात झाली. काही तासातच जमिनीतून पाण्याचे फवारे सुरू झाले. दीड इंच पाणी लागल्याचे मालदार कुटुंबीयांनी सांगितले. या पाण्याचा वापर मालदार कुटुंबाने शेजारील शेतमालकांनाही देणार असल्याचे सांगितले. सरकारकडून मिळालेल्या निधीचा मालदार कुटुंबाने सदुपयोग केला असून याची परिसरात चर्चा सुरू आहे.









