भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिचे ऑलिंपिक पदक हुकल्याच्या प्रकरणी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वजन व्यवस्थापन हे खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे उत्तरदायित्व असते. त्याचा ऑलिंपिक संघटनेशी संबंध नसतो. त्यामुळे या संदर्भात संघटनेवर व त्यांच्या मेडिकल टीमवर होणारी टीका अनाठायी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि ज्युडो या खेळांमध्ये वजनाप्रमाणे गट केलेले असतात. ज्या गटात खेळायचे असेल त्याप्रमाणे वजनाचे व्यवस्थापन करावे लागते. हे काम संबंधित खेळाडूचे आणि त्याच्या प्रशिक्षकाचे असते. ऑलिंपिक संघटनेने खेळाडूंसाठी डॉ. परडीवाला यांची मुख्य वैद्यकीक अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, वजन व्यवस्थापन ही त्यांची कार्यकक्षा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
खेळाडूंच्या निवडीचा सहकारीवर्ग
पदक मिळविण्याची शक्यता असणाऱ्या खेळाडूंना त्यांचा सहकारीवर्ग (सपोर्ट स्टाफ) निवडण्याची मुभा देण्यात आली होती. जे खेळाडू आपला सहकारीवर्ग निवडण्याच्या परिस्थितीत नव्हते, त्यांना संघटनेने तो मिळवून दिला होता. खेळाडूंना त्यांचे कौशल्य पूर्णत: उपयोगात आणता यावे, अशा प्रकारे वातावरण ठेवण्यात संघटनेने कोणतीही कसूर पेलेली नाही, असेही प्रतिपादन उषा यांनी केले आहे. मात्र विनेशसंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपले हात झटकल्याचे अनेकांनी ठपका ठेवत त्यांच्यावर टीका केली आहे.
अंतिम लढतीतून अपात्र ठरविल्यानंतर विनेशने आपल्याला रौप्यपदक मिळावे यासाठी क्रीडा लवादाकडे अपील केले असून लवादाचा निर्णय आज मंगळवारी रात्री जाहीर केला जाणार आहे.









